दौसात धावत्या कारमध्ये गर्भवती अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा आरोप, गाडीतच प्रसूती
तीन जणांनी अपहरण करून धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप असून, पोलिसांनी अपहरण, सामूहिक बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप असून, या प्रकाराने सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. ही मुलगी आधीपासूनच गर्भवती होती. आरोपानुसार, अत्याचार सुरू असतानाच गाडीत तिची प्रसूती झाली. वयाच्या सोळाव्या वर्षी जगण्याची स्वप्ने पाहण्याच्या वयात एका अल्पवयीन मुलीवर असा प्रसंग ओढवल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रात्रीच्या वेळी तीन जणांनी या मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिचे अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ही कार दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या दिशेने नेण्यात आली. धावत्या कारमध्येच या तिघांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रचंड शारीरिक आणि मानसिक यातनांदरम्यान आणि वेदना सहन करत असतानाच गाडीतच तिची प्रसूती झाली आणि तिने मुलीला जन्म दिला.
आरोपींनी रक्ताने माखलेल्या आणि वेदनेने विव्हळणाऱ्या त्या मुलीला दौसा कलेक्टरेट चौकातील रस्त्यावर तसेच सोडून दिले आणि ते तिथून पसार झाले, असा आरोप आहे. रस्त्यावर असहाय्य अवस्थेत पडलेल्या मुलीने कसाबसा धीर करून तिथल्या एका स्थानिक नागरिकाकडे मदत मागितली. त्या नागरिकाने कोणतीही वेळ वाया न घालवता तिला उपचारांसाठी दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मुलीने आपल्या नवजात बाळाला कपड्यात गुंडाळून रुग्णालयात आणले होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली असता, जन्माला आलेल्या त्या नवजात बाळाला मृत घोषित केले. या घटनेमुळे रुग्णालयात आणि आसपासच्या परिसरात शोककळा पसरली असून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही मुलगी याआधीच गर्भवती होती. साधारण फेब्रुवारी आणि मे महिन्यात अजय कुमार मीणा नावाच्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. त्यातूनच ती गर्भवती राहिली, असे सांगितले जात आहे.
घटनेची गंभीर दखल घेऊन स्थानिक पोलीस तातडीने दौसा जिल्हा रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी मुलीचा सविस्तर जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू केले आहे. आरोपींविरोधात अपहरण आणि सामूहिक बलात्कारासह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.