चांदा इंडस्ट्रियल इस्टेटमधील ३ कोटींची कामे पूर्ण; मुनगंटीवारांचे आभार
मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते आणि प्रवेशद्वाराच्या कामानंतर संचालक मंडळाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले; उर्वरित कामे येत्या काही महिन्यांत मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूरमधील चांदा इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेटमध्ये मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते आणि मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या कामांवर तब्बल ३ कोटी रुपये खर्च झाले. काम पूर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.
या कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, ही कामे पूर्ण करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. आभार व्यक्त करण्यासाठी संचालक मंडळाने बोलावले, याचा मनापासून आनंद आहे. सर्वांनी केलेले प्रेमळ स्वागत आणि दाखवलेली आपुलकी माझ्यासाठी मोलाची आहे, कारण आयुष्यात शेवटी माणसाच्या सोबत राहतात ती त्याने कमावलेली माणसे, त्यांचे प्रेम आणि विश्वास, असेही ते म्हणाले.
चांदा इंडस्ट्रियल इस्टेट हे एकेकाळी चंद्रपूरच्या औद्योगिक वैभवात मोलाची भर घालणारे क्षेत्र होते. पण आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याने कालांतराने या परिसराच्या विकासाला हवी तशी गती मिळाली नाही. आजही काही कामे बाकी आहेत आणि येत्या काही महिन्यांत ती मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न राहतील, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. इथल्या उद्योजकांना गरजेच्या सुविधा मिळाव्यात, उद्योगांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार व्हावे आणि चांदा इंडस्ट्रियल इस्टेटने औद्योगिक क्षेत्रात पुन्हा स्वतंत्र ओळख निर्माण करावी, यासाठी मी ठामपणे प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
चंद्रपूर शहराला ५०० वर्षांहून अधिक काळाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंड राजे खांडक्या बल्लाळशाह आणि राणी हिराई यांच्या योगदानातून हे शहर उभे राहिले. या शहराला आधुनिक विकासाची जोड मिळावी, यासाठी अनेक प्रकल्प पुढे आले आहेत. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वन अकादमी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, सैनिक शाळा आणि बॉटनिकल गार्डन या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या विकासाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांना नवी दिशा मिळाली आहे.
शिक्षणाच्या क्षेत्रातही नव्या संधी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मूल येथे ५० एकर परिसरात एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र, पॉलिटेक्निक कॉलेज आणि कृषी महाविद्यालय उभारण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. उच्च शिक्षणाची सोय अधिक चांगली व्हावी म्हणून बाबूपेठ परिसरात आठ एकर जागेत गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
दळणवळणाच्या बाबतीत मोरवा विमानतळाचे नूतनीकरण करून त्याचा उडान योजनेत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न झाले. चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचाही प्रयत्न झाला. बल्लारपूर-मुंबई रेल्वेगाडीला 'ताडोबा एक्सप्रेस' हे नाव देण्याच्या उपक्रमातून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख मुंबईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चंद्रपूर हे केवळ ऐतिहासिक शहर न राहता शिक्षण, आरोग्य, उद्योग, पर्यटन आणि दळणवळण या क्षेत्रांत सक्षम आधुनिक शहर म्हणून विकसित व्हावे, अशी या सर्व प्रयत्नांमागची भूमिका आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
चांदा इंडस्ट्रियल इस्टेटच्या विकासामुळे स्थानिक उद्योजकांना दिलासा मिळेल आणि परिसरातील औद्योगिक घडामोडींना चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. रस्ते आणि प्रवेशद्वारासारख्या मूलभूत सुविधा ही औद्योगिक विकासातील महत्त्वाची पायरी आहे. उरलेल्या पायाभूत सुविधा पूर्ण करणे, उद्योजकांच्या अडचणी सोडवणे आणि संपूर्ण परिसराचा विकास करणे यालाही तितकेच महत्त्व आहे.
आ. मुनगंटीवार म्हणाले की, आज तुम्ही माझे आभार मानले असले, तरी मी याकडे केवळ आभार समारंभ म्हणून पाहत नाही. हा सन्मान म्हणजे पुढची विकासकामे पूर्ण करण्यासाठी मिळालेली ऊर्जा आणि वाढलेली जबाबदारी आहे. चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवाला आधुनिक विकासाची जोड देणे, औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि स्थानिक उद्योजकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, यासाठी विकासाचा प्रवास अधिक गतिमान करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या वेळी महापौर संगीता खांडेकर, डॉक्टर मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, कल्पना पालिकुंडवार, पद्मकुमार नायर, मनोज सिंघवी, रवी लोणकर, सुनीता जयस्वाल, रुद्रनारायण तिवारी यांच्यासह इंडस्ट्रियल इस्टेटचे संचालक मंडळ उपस्थित होते.