स्वयंपाकघरातील चमच्यांची नवी रचना: राहुल अग्रवाल यांना US Shark Tank मध्ये ३.३ कोटींची गुंतवणूक
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारतीय वंशाचे डिझायनर राहुल अग्रवाल यांच्या पॉलीगॉन डिझाइन स्टार्टअपला अमेरिकन शो शार्क टँक यूएसएमध्ये अंदाजे ३.३ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली.
रोजच्या वापरातली एखादी लहानशी वस्तू सुद्धा मोठ्या व्यवसायाचा पाया ठरू शकते, हे भारतीय वंशाचे डिझायनर राहुल अग्रवाल यांनी करून दाखवले आहे. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मोजमापाच्या चमच्यांना त्यांनी नव्या रूपात तयार केले आणि 'शार्क टँक यूएसए' या अमेरिकन बिझनेस रिॲलिटी शोमध्ये आपल्या कल्पनेने गुंतवणूकदारांना प्रभावित केले. त्यांच्या 'पॉलिगॉन डिझाइन' या स्टार्टअपला अंदाजे ३.३ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे.
स्वयंपाक किंवा बेकिंग करताना वेगवेगळे प्रमाण मोजण्यासाठी आपल्याला अनेक चमचे ठेवावे लागतात. त्यामुळे स्वयंपाकघरातील ड्रॉवरमध्ये जागा व्यापली जाते आणि ते नीट लावणे अवघड होते. राहुल यांनी याच समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या चमच्यांचे वैशिष्ट्य काय, ते पाहू. मोठ्या चमच्याने अर्धा टेबलस्पून, एक टेबलस्पून आणि दोन टेबलस्पून मोजता येतात. लहान चमच्याने पाव टीस्पून, अर्धा टीस्पून आणि एक टीस्पून मोजता येतात. वापरानंतर हे चमचे चपटे करता येतात. ते अंदाजे २.८ मिलिमीटर जाड आहेत आणि magnetized असल्यामुळे फ्रिजवर ठेवता येतात. पॉलीगॉन हा ब्रँड मोजमापाच्या चमच्यांचा असा संच सादर करतो, ज्यात सहा पारंपरिक चमच्यांऐवजी फक्त दोन चपटे आणि लवचिक चमचे आहेत. त्यांना हव्या त्या आकारात वाकवता येते.
राहुल अग्रवाल हे भारतीय वंशाचे नवोन्मेषक आणि उत्पादन डिझायनर आहेत. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनमध्ये त्यांनी डिझाइनचे शिक्षण घेतले. औद्योगिक डिझाइन, उत्पादन डिझाइन आणि वापरकर्ता अनुभव अशा क्षेत्रांत अनुभव घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांनी पॉलीगॉन डिझाइनची स्थापना केली. दैनंदिन वस्तू अधिक उपयुक्त आणि सोयीस्कर करणे हे त्यांचे ध्येय आहे.
यशस्वी स्टार्टअपसाठी नेहमीच काहीतरी पूर्णपणे नवीन तयार करावे लागते असे नाही, असे राहुल यांची कथा दाखवते. अस्तित्वात असलेल्या उत्पादनात सुधारणा केल्यानेही मोठी व्यावसायिक संधी निर्माण होऊ शकते. त्यांचा फोल्डिंग चमचा हे याच दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. स्वयंपाकघरातील एका साध्या उपकरणाचे रूपांतर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी आकर्षक व्यावसायिक प्रस्तावात झाले.
राहुल यांनी शोच्या १८ व्या सीझनच्या चौथ्या एपिसोडमध्ये आपला व्यवसाय सादर केला. अभिनेत्री आणि गुंतवणूकदार मिंडी केलिंग आणि गुंतवणूकदार लॉरी ग्रेनर यांनी संयुक्तपणे त्यांना $३५०,०००, म्हणजेच अंदाजे ३.३ कोटी रुपयांची गुंतवणूक देऊ केली. या करारानुसार गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये ८ टक्के हिस्सा आणि अतिरिक्त २ टक्के सल्लागार हिस्सा घेण्यास सहमती दर्शवली. या करारानंतर कंपनीचे मूल्य अंदाजे $३.५ दशलक्ष झाले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.