गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

भाजपच्या 'लोकशाही वाचवा' पदयात्रेमुळे नागपुरात वाहतूक कोंडी, दिवाळीच्या खरेदीला फटका

नागरी PT24 शहर डेस्क

विदर्भातील जिल्ह्यांतून ३० ते ३५ हजार कार्यकर्ते ५ हजारांहून अधिक वाहनांतून आल्याने नागपुरातील प्रमुख रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्या; बाजारपेठा आणि रुग्णवाहिकांनाही फटका बसला.

भाजपने गुरुवारी नागपुरात 'लोकशाही वाचवा' पदयात्रा काढली आणि त्यामुळे संपूर्ण शहराची वाहतूक विस्कळीत झाली. विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून ५ हजारांहून अधिक वाहनांतून ३० ते ३५ हजार कार्यकर्ते नागपुरात आले. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दिवाळीच्या तोंडावर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. राजकीय कार्यक्रमासाठी शहरात एवढी मोठी गर्दी जमवताना सामान्य नागरिकांच्या गैरसोयीचा विचार कुणीच केला नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

छत्रपती चौक ते मानकापूर या पट्ट्यात तसेच वर्धा मार्गावरून शहरात येणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक पूर्ण थांबल्यासारखी झाली. जनता चौक ते संविधान चौक या मार्गावरही गाड्यांच्या रांगा होत्या. कस्तुरचंद पार्क उड्डाणपूल, एलआयसी चौकातील उड्डाणपूल आणि आदिवासी गोवारी उड्डाणपूल या ठिकाणीही गाड्यांची गर्दी झाली. अनेक रस्त्यांवर वाहनचालकांना पुढे जायला वाटच मिळत नव्हती. पदयात्रेसाठी आलेल्या वाहनांच्या गर्दीने शहरातील रोजची वाहतूक अक्षरशः ठप्प झाली.

दिवाळी तोंडावर असल्याने सीताबर्डी आणि धंतोली येथील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोकांची गर्दी होती. पदयात्रेमुळे रस्ते अडवले गेल्याने या बाजारपेठांपर्यंत पोहोचणेही अवघड झाले. पोलिसांनी अनेक मार्ग बंद केले, त्यामुळे नागरिकांना लांबचा वळसा घालून जावे लागले. कुटुंबासह खरेदीला निघालेले नागरिक, ज्येष्ठ आणि लहान मुले यांना याचा जास्त त्रास झाला. सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनाही या कोंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

धंतोली आणि रामदासपेठ परिसरात अनेक मोठी खासगी रुग्णालये आहेत. या भागात संध्याकाळी वाहतुकीचा ताण आधीच असतो. त्यातच पदयात्रेमुळे झालेल्या कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही बसला. आपत्कालीन सेवांसाठी वेगळी मार्गिका आणि पुरेशी व्यवस्था होती का, हा गंभीर प्रश्न आहे. रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकांनाच अडथळे पार करावे लागत असतील, तर वाहतूक नियोजनाच्या दाव्यांचा उपयोग काय, असेही विचारले जात आहे.

या पदयात्रेसाठी ७०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाईल, असे सांगण्यात आले होते. वाहतूक कोंडी होणार नाही, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात प्रमुख चौक, उड्डाणपूल आणि बाजारपेठांकडे जाणारे रस्ते गाड्यांनी भरून गेले. एवढा बंदोबस्त असूनही वाहतूक सुरळीत ठेवता का आली नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

राजकीय पक्षांना आपली ताकद दाखवण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा अधिकार कुणालाच नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. लोकशाही वाचवण्याच्या पदयात्रेत सामान्य जनतेचे हाल मात्र दुर्लक्षित राहिले. पदयात्रा संपेल आणि कार्यकर्ते परत जातील, पण कोंडीत वाया गेलेला वेळ आणि नागरिकांना झालेला मनस्ताप कोण भरून देणार, असाही प्रश्न विचारला जात आहे.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ