शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

बायनान्सवरील ६.३ अब्ज डॉलर्सच्या सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाचे हॅकर्स, एफबीआयचा दावा

बायनान्सवरील ६.३ अब्ज डॉलर्सच्या सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाचे हॅकर्स, एफबीआयचा दावा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जग PT24 टीम

उत्तर कोरियाच्या 'हॅकर आर्मी'ची सायबर सुरक्षेच्या जगात जोरदार चर्चा सुरू आहे. लहान वयापासून प्रशिक्षण, ८,००० हून अधिक सायबर कमांडोज आणि मोठी बक्षिसे, असे अहवालांतील तपशील आहेत.

सायबर सुरक्षेच्या जगात सध्या एकाच विषयाची जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे उत्तर कोरियाची अत्यंत गुप्त आणि तितकीच धोकादायक मानली जाणारी 'हॅकर आर्मी'. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, बायनान्स (Binance) या जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजवर ६.३ अब्ज डॉलर्सचा सायबर हल्ला झाला. त्यामागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात असल्याचा दावा एफबीआय (FBI) आणि आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थांनी केला आहे.

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला उत्तर कोरियासारखा देश जगातील सर्वात प्रगत देशांमधील डिजिटल तिजोऱ्यांवर डाका कसा टाकतो, हा प्रश्न आता संपूर्ण जगाला पडला आहे.

उत्तर कोरियातील हॅकर्सचे हे सैन्य अचानक उभे राहिलेले नाही. अनेक वर्षांच्या नियोजनबद्ध धोरणातून ते तयार झाले आहे. २००४ मध्ये उत्तर कोरियातून पळून दक्षिण कोरियात शरण आलेले माजी हॅकर ट्रेनर किम ह्युंग-क्वांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन सायबर वॉरफेअरला त्यांच्या अण्वस्त्रांइतकेच महत्त्व देतात.

उत्तर कोरियात दरवर्षी शाळेच्या पातळीवरून, म्हणजे सुमारे ११ ते १२ वर्षे वयाच्या मुलांमधून, सर्वात हुशार १५० ते २०० विद्यार्थी निवडले जातात. या विद्यार्थ्यांना विशेष अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आणि देशातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये संगणक शास्त्र, प्रगत गणित, परदेशी भाषा आणि अत्याधुनिक क्रिप्टो सिस्टीमचे शिक्षण दिले जाते. सैनिकांप्रमाणेच त्यांच्यावर कडक नियम आणि शिस्त लादली जाते.

दक्षिण कोरियाच्या इंटेलिजन्स सर्व्हिसच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाकडे सध्या सुमारे ८,००० हून अधिक सायबर कमांडोज कार्यरत आहेत. हे हॅकर्स फक्त उत्तर कोरियातच नाहीत, तर चीन, रशिया आणि इतर मित्र देशांत राहूनही डिजिटल कारवाया करतात. लॅझारस ग्रुप (Lazarus Group) आणि ट्रेडरट्रेडर (TraderTraitor) यांसारख्या कुख्यात सायबर गटांचा संबंध थेट उत्तर कोरियाच्या लष्करी गुप्तचर संस्थेशी जोडला जातो.

क्रिप्टो जगतातील सर्वात मोठा दरोडा मानला जाणारा ६.३ अब्ज डॉलर्सचा बायनान्स हॅक हा उत्तर कोरियाच्या हॅकिंग क्षमतेचा मोठा पुरावा मानला जात आहे. रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी एका इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये फेक जॉब इंटरव्यू आणि मालवेअरच्या (Malicious Software) मदतीने प्रवेश मिळवला आणि काही मिनिटांतच अब्जावधी डॉलर्सच्या रकमेची अफरातफर केली.

उत्तर कोरिया सरकार अशा हॅकिंग मोहिमांना मोठा राष्ट्रीय विजय मानते. यशस्वी हॅकर्सना राजधानी प्योंगयांगमध्ये आलिशान फ्लॅट्स, रोख अमेरिकी डॉलर्स, परदेशात फिरण्याची मुभा आणि सत्ताधारी पक्षात महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्यामुळे या हॅकर्ससाठी हॅकिंग हे फक्त काम राहत नाही, तर देशासाठी दिलेले योगदान ठरते.

उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी निधी उभारण्यासाठी उत्तर कोरिया सायबर चोऱ्यांचा मार्ग अवलंबत असल्याचा आरोप अमेरिका, ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देश सातत्याने करत आहेत. ही हॅकर आर्मी येत्या काळात जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी आणखी मोठा धोका निर्माण करू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

#नागपूर#दुनिया#PT24#World#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ