बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

बाळापूर तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; गावांत ८-१० दिवस नळ कोरडे, मन नदीत मूर्ती अर्धवट बुडल्या

बाळापूर तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; गावांत ८-१० दिवस नळ कोरडे, मन नदीत मूर्ती अर्धवट बुडल्या छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

मन, महेश आणि भिकुंड नद्यांची पातळी घटली असून नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थ हैराण आहेत.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात, विशेषतः ग्रामीण भागात, पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. मन, महेश आणि भिकुंड या तीन मुख्य नद्या तालुक्यासाठी जीवनदायिनी मानल्या जातात. मात्र मन नदीवरील फक्त दोन प्रमुख धरणे वगळता बाकीच्या नद्या, छोटे बंधारे आणि तलाव यांनी तळ गाठला आहे.

याचा थेट फटका गावखेड्यांना बसत असून तब्बल ८ ते १० दिवस नळाला पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नदीपात्रातील पाणी कमी झालेले असतानाच संपूर्ण नदीला जलपर्णी वेलींचा विळखा पडला आहे. त्यातच नुकताच गणेशोत्सव आणि त्यानंतर नवरात्रोत्सव मोठ्या थाटात पार पडला.

बाळापूर येथील बायपास रोडने राष्ट्रीय महामार्गावरील मन नदीच्या पुलावरून गेल्या दोन दिवसांपासून क्रेनच्या मदतीने माँ दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन सुरू आहे. अकोला जिल्ह्यासोबतच शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातूनही शेकडो गणेश आणि देवी मंडळे विसर्जनासाठी बाळापूरला येतात. आधीच पाणीटंचाई आणि जलपर्णीमुळे अडचणीत आलेल्या मन नदीपात्रात शेकडो मोठ्या मूर्तींचे विसर्जन झाल्याने परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. मूर्तींचा आकार मोठा आणि नदीत पुरेसे पाणी नाही, त्यामुळे अनेक देवींच्या मूर्ती पाण्यावर तरंगताना किंवा अर्धवट बुडालेल्या अवस्थेत दिसत आहेत.

नऊ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जमा झालेले निर्माल्य थेट नदीपात्रातच टाकले जात असल्याने पात्रात सर्वत्र घाण आणि अस्वच्छता पसरली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. आमच्या भागात आधीच १०-१० दिवस नळाला पाणी येत नाही, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे, त्यातच मन नदीची पाणीपातळी कमी होत चालली आहे, असे नागरिक सांगत आहेत. विसर्जनामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण आणि निर्माल्य साचले आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नदीपात्राची स्वच्छता करावी, अन्यथा येत्या काळात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी नागरिकांची मागणी आहे.

पाण्याचा तुटवडा असतानाही योग्य पर्यायी व्यवस्था न केल्याने भविष्यातील पाणी संकट अधिक गडद होणार आहे. सध्याची स्थिती पाहता येत्या उन्हाळ्यात बाळापूर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे आणि दुसरीकडे नद्यांचे प्रदूषण वेगाने वाढत आहे.

त्यामुळे मन नदीपात्रातील जलपर्णी तातडीने काढणे, विसर्जनस्थळी साचलेले निर्माल्य आणि कचरा साफ करून नदीची स्वच्छता मोहीम राबवणे, तसेच पुढचे पाणी संकट टाळण्यासाठी जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेणे गरजेचे झाले आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र जनक्षोभ उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ