रविवार, 11 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:42 IST

पाणीटंचाईमुळे अकोल्यात बांधकाम व्यवसाय ठप्प, मजुरांच्या रोजगारावर संकट

जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत बांधकामांवर स्थगिती आणल्याने अकोल्यातील मजूर, विकासक आणि व्यापारी अडचणीत आले आहेत.

पाणीटंचाईमुळे अकोल्यात बांधकाम व्यवसाय ठप्प, मजुरांच्या रोजगारावर संकट छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अकोला जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून दुष्काळसदृश परिस्थितीही आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे आणि जिल्ह्यातील बांधकामांवर तातडीने स्थगिती आणली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचा स्थानिक बांधकाम व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. या क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेले हजारो मजूर आणि व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. पाणीटंचाईमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून उद्योजक आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

बांधकामांवरील स्थगितीमुळे अकोला शहर आणि परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो मजुरांचा रोजगार अचानक बंद झाला आहे. हाताला काम नाही आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न निर्माण झाल्याने परजिल्ह्यांतून तसेच ग्रामीण भागातून आलेल्या अनेक कामगारांनी आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे स्थलांतर वाढले आहे.

बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याचा फटका केवळ सिमेंट आणि विटांच्या व्यावसायिकांनाच बसलेला नाही, तर टाइल्स, हार्डवेअर, प्लंबिंग साहित्य, रंग आणि सळई विकणाऱ्या विक्रेत्यांनाही बसला आहे. टाइल्सची विक्री आणि मागणी मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. व्यापाऱ्यांच्या गोदामांमध्ये माल पडून असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल प्रभावित झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नव्याने सुरू होणारी तसेच ७० टक्क्यांपेक्षा कमी पूर्ण झालेली बांधकामे तातडीने थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे नवीन बांधकामांची कामे सुरू करणेही शक्य होत नाही. अंतिम टप्प्यात असलेली काही बांधकामे सुरू आहेत, मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे त्यांच्या कामाचा वेग मंदावला आहे.

बांधकामांवर अचानक आलेल्या स्थगितीमुळे विकासक, कंत्राटदार आणि लहान-मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकांचे हप्ते, दुकानांचे भाडे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन कसे भागवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असले, तरी बांधकाम बंदीमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या समस्येवर शासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिक आणि पूरक व्यवसायांतील व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

अकोल्यातील बांधकाम व्यवसायात मध्य प्रदेशातून आलेल्या मजुरांची संख्या मोठी आहे. विशेषतः बैतूल जिल्ह्यातील अनेक मजूर येथे काम करतात. बांधकामे बंद झाल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. नियमित काम आणि उत्पन्न बंद झाल्यामुळे अनेक मजुरांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ