बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 211 | Poor 03:04 IST

अकोल्यात यूपीआयने एसटीचे तिकीट काढणारे वाढले, सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद घटले

अकोला विभागात यूपीआयने तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा ४ हजार ७९४ ने वाढली आहे; मात्र नेटवर्कच्या तक्रारीही वाढत आहेत.

अकोल्यात यूपीआयने एसटीचे तिकीट काढणारे वाढले, सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद घटले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

एसटीने प्रवास करताना तिकिटासाठी सुटे पैसे मागितले की प्रवासी आणि वाहक यांच्यात वाद व्हायचे, हे चित्र आता हळूहळू बदलताना दिसत आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटी प्रवासात डिजिटल व्यवहार सुरू केल्यामुळे असे वाद कमी झाले आहेत. अकोला डेपोत यूपीआय तिकिटाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अकोला विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एसटीतून प्रवास करणाऱ्यांपैकी १४ हजार १२३ प्रवाशांनी यूपीआयने पैसे भरून तिकीट काढले होते. यंदा हा आकडा १८ हजार ९१७ वर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ हजार ७९४ प्रवाशांची वाढ झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात एकूण सुमारे १८ हजार ९१७ प्रवाशांनी यूपीआयच्या माध्यमातून तिकीट काढले. त्यातून अकोला डेपो क्रमांक १ मध्ये १ लाख ८९ हजार २५५ रुपयांचा महसूल जमा झाला, असे अकोला एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. येत्या एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्या असल्याने प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यूपीआय व्यवहारांतून लाखो रुपयांचा महसूल जमा होण्याची अपेक्षा आहे.

फोन पे, गूगल पे, भीम अॅप आणि तत्सम यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे प्रमाण अकोला जिल्ह्यात सतत वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली आहे आणि वाहक व प्रवाशांमधल्या वादावादीलाही आळा बसताना दिसतो. मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांच्या आकडेवारीनुसार, एसटी महामंडळात दररोज लाखोंच्या संख्येने यूपीआय व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाले.

दुसरीकडे, नेटवर्कच्या अडचणी अनेकदा येत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचेही समोर आले आहे.

एसटीची ओळख असलेली लालपरी, मग शिवशाही आणि आता पर्यावरणपूरक ई-ग्रीन बससेवा, असा एसटीचा प्रवास वातानुकूलित आणि आरामदायी सेवेपर्यंत पोहोचला आहे. या सेवा प्रवाशांना आवडत आहेत. सध्या ई-बससेवा प्रवाशांसाठी खास आकर्षण ठरत आहे, आणि या सेवेत यूपीआय, डिजिटल आणि ऑनलाइन तिकिटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे.

अकोला विभागीय नियंत्रक स्मिता सुतवणे म्हणाल्या, की यूपीआयने तिकीट काढण्याच्या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुट्ट्या पैशांची अडचण दूर होण्यासोबतच तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली आहे. डिजिटल पेमेंटमुळे प्रवाशांचा वेळ वाचतो आणि हातात रोख रक्कम नसतानाही तिकीट काढता येते. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ