विजेच्या धक्क्याने शिवसेना विभागप्रमुख योगेश वाघ यांचा मृत्यू, रुग्णालयात नातेवाईक आणि शिवसैनिकांची गर्दी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जळगावच्या पिंप्राळा परिसरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना वायरमन योगेश उर्फ भैय्या वाघ यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. पाळधी-तरसोद बायपासवर आणखी एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात एका घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून खासगी वायरमन योगेश उर्फ भैय्या वाघ यांचा मृत्यू झाला. ही घटना धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर वाघ यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
योगेश वाघ हे शिवसेना ठाकरे गटाचे पिंप्राळा भागाचे विभागप्रमुख होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचे नातेवाईक आणि शिवसैनिकांनी रुग्णालयात गर्दी केली.
भैय्या वाघ सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी त्यांच्या मृत्यूची बातमी समजल्याने कुटुंबीयांना तसेच स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगर अध्यक्ष गजानन मालपुरे यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले.
मंगळवारी भुसावळ येथेही अशीच एक दुर्घटना घडली होती. तिथे एका शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला. घरात एकीकडे मुलीच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती आणि दुसरीकडे आई-वडिलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी शिवसेना विभागप्रमुख योगेश वाघ यांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, जळगाव शहरालगतच्या पाळधी-तरसोद बायपासवर अपघातांची मालिका सुरूच आहे. तिथे आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात योगेश गजमल राक्षे यांचा मृत्यू झाला. बायपास धसल्यानंतर या मार्गावरील अपघातांत मृत्यू झालेल्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे.
योगेश राक्षे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होते. ते दुचाकीने घरी जात असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या योगेश यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
30 जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यानंतर बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे अवजड वाहतूक शहरातून वळवण्यात आली. जुलैपासून आतापर्यंत या मार्गावर झालेल्या 25 अपघातांत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
योगेश राक्षे यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे राक्षे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातानंतर पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.