शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती देणाऱ्याला अमेरिका देणार २० दशलक्ष डॉलरपर्यंत बक्षीस

इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती देणाऱ्याला अमेरिका देणार २० दशलक्ष डॉलरपर्यंत बक्षीस छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जग PT24 टीम

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या अणुकार्यक्रमाची ठिकाणे, उपकरणे किंवा कर्मचाऱ्यांची महत्त्वाची माहिती देणाऱ्याला २० दशलक्ष डॉलरपर्यंत बक्षीस जाहीर केले आहे. गरज पडल्यास माहिती देणाऱ्याला दुसरीकडे हलवण्याचेही आश्वासन दिले आहे.

इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती काढण्यासाठी अमेरिकेने आता मोठ्या रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिकेच्या लष्कराचे मुख्यालय असलेल्या सेंट्रल कमांडने शुक्रवारी ही घोषणा केली. इराणच्या अणुकार्यक्रमाशी जोडलेली ठिकाणे, उपकरणे किंवा कर्मचारी यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती देणाऱ्या माणसाला २० दशलक्ष डॉलरपर्यंत बक्षीस मिळणार आहे.

माहिती देणाऱ्याच्या सुरक्षिततेचाही विचार केला गेला आहे. गरज पडली तर त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची सोय करण्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. आवश्यक असल्यास दुसऱ्या देशात स्थलांतर करण्याची सुविधाही दिली जाणार आहे.

ही बक्षीस योजना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या 'Rewards for Justice' या कार्यक्रमांतर्गत राबवली जात आहे. इराणमधील अणुसंशोधन केंद्रे, युरेनियम संवर्धनाशी संबंधित उपकरणे, वैज्ञानिक आणि या कार्यक्रमाशी जोडलेले इतर कर्मचारी यांची माहिती अमेरिकेला हवी आहे. फक्त ठिकाणांचीच नाही, तर उपकरणे किंवा कर्मचाऱ्यांच्या हालचालींची माहिती देणाऱ्यांनाही बक्षीस मिळू शकते. मात्र २० दशलक्ष डॉलरचे सर्वोच्च बक्षीस मिळवण्यासाठी नेमके कोणते निकष असतील, हे अजून स्पष्ट केलेले नाही.

इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकेने आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) याआधीही चिंता व्यक्त केली आहे. युरेनियम संवर्धनाची पातळी, अणुइंधनाचा साठा आणि सेंट्रीफ्यूजसारखी महत्त्वाची उपकरणे यांबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही, हा मुद्दा अमेरिकेने मांडला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इराणने IAEA च्या सुरक्षा उपायांशी संबंधित जबाबदाऱ्या पाळल्या नाहीत. त्यामुळे अणुकार्यक्रमातील महत्त्वाच्या घटकांवर देखरेख ठेवणे अवघड झाले आहे. आता बक्षिसाच्या मार्गाने अधिक अचूक माहिती मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न दिसतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी असे दावे केले होते की अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रम मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाला आहे. तरीही त्याच कार्यक्रमाची माहिती मिळवण्यासाठी २० दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा रंगली आहे.

काही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की इराणचा प्रकल्प फारसा पुढे गेलेलाच नाही, म्हणजे जे शोधले जात आहे ते मुळात अस्तित्वातच नाही. काही विश्लेषकांच्या मते मात्र हा प्रकल्प सुरू आहे आणि तो इराणच्या डोंगराखाली खोलवर चालू आहे, फक्त त्याच्या जागेची स्पष्टता मिळत नाही.

दुसरीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी राजनैतिक प्रयत्नही सुरू आहेत. कतारच्या मार्फत दोन्ही देशांमध्ये संभाव्य चर्चेसाठी प्रयत्न होत असल्याचे वृत्त आहे. अशा वेळी अमेरिकेची ही घोषणा इराणवरचा दबाव वाढवण्याच्या रणनीतीचा भाग मानली जात आहे. अणुकार्यक्रमाची प्रत्यक्ष स्थिती, त्यातली उरलेली क्षमता आणि त्याची यंत्रणा यांची माहिती मिळवणे हे अमेरिकेचे प्रमुख उद्दिष्ट या निर्णयातून दिसते.

#नागपूर#दुनिया#PT24#World#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ