आता कीपॅड फोनवरही UPI पेमेंट सपोर्ट, Itel 2165C मध्ये फोनपे
Itel ने त्यांच्या फीचर फोन Itel 2165C मध्ये फोनपेचा सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. इंटरनेट कनेक्शनशिवाय डिजिटल पेमेंट करता येणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन या दोन गोष्टी ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात. पण आता कीपॅड फोन वापरणाऱ्यांनाही डिजिटल पेमेंटची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणं अधिक सोपं होणार आहे. याबद्दल Itel ने घोषणा केली आहे.
Itel ने त्यांच्या फीचर फोन Itel 2165C मध्ये फोनपेचा सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. या इंटीग्रेशनमुळे वापरकर्ते कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय डिजिटल पेमेंट सुविधा वापरू शकणार आहेत. म्हणजे इंटरनेट नसतानाही कीपॅड फोनवरून डिजिटल पेमेंट करता येणार आहे.
आजच्या डिजिटल काळात स्मार्टफोनवरून ऑनलाईन पेमेंट करणं ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. किराणा दुकानापासून ते मॉलमध्ये जाऊन केलेल्या खरेदीपर्यंत सगळीकडे ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडला जातो. त्याचं कारण म्हणजे ऑनलाईन पेमेंट करणं अतिशय सोपं आहे आणि पेमेंट करताना सुट्ट्या पैशांची कटकट नसते. अनेकदा ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर वापरकर्त्यांना रिवॉर्ड्सही मिळतात.
या सुविधेमुळे 2G नेटवर्कवर अवलंबून असलेल्या वापरकर्त्यांपर्यंत UPI वर आधारित पेमेंट सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही सुविधा अशा वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली आहे, जे स्मार्टफोनऐवजी कीपॅड फोन वापरतात. 2G नेटवर्क वापरणाऱ्या लोकांनाही भारताच्या UPI आधारित डिजिटल पेमेंट सिस्टिमशी जोडणं हा कंपनीचा उद्देश आहे. रोजच्या आयुष्यात वापरलं जाणारं तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा हेतू आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.
आता फोनबद्दल. Itel 2165C हा एक फीचर फोन आहे. यात 2 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 1,200mAh ची बॅटरी मिळणार आहे. बॅटरीचा वापर नियंत्रित ठेवण्यासाठी कंपनीने 'एआय बॅटरी' आणि 'सुपर बॅटरी मोड' असे पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन एकदा चार्ज केल्यावर 11.67 तासांपर्यंत टॉक टाइम आणि 25 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देऊ शकतो. मात्र बॅटरी बॅकअप हा फोनचा वापर आणि नेटवर्कची स्थिती यावर अवलंबून असणार आहे. याशिवाय या फोनमध्ये 32GB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेजची सुविधाही देण्यात आली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.