शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

वाशिममध्ये एनसीसी विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनवून दिला पाणी बचतीचा संदेश

वाशिममध्ये एनसीसी विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनवून दिला पाणी बचतीचा संदेश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

बाकलीवाल विद्यालयातील ८३ विद्यार्थ्यांनी जलसंधारण अभियानाला हातभार लावत आकाश कंदील स्पर्धेतून जलसंवर्धन आणि मृदसंवर्धनाचा संदेश दिला.

वाशिम, ६ नोव्हेंबर - जिल्ह्यात जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. कार्यकारी अभियंता हरेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम सुरू आहेत. याच मालिकेत एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी आकाश कंदीलातून पाणी वाचवण्याचा संदेश दिला.

जलसंधारण अभियान २१ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या काळात राबवले जात आहे. जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर, मृदसंवर्धन आणि पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानाला हातभार लावण्यासाठी श्री बाकलीवाल विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या पुढाकाराने आकाश कंदील स्पर्धा घेण्यात आली. 'आजचे जलसंवर्धन उपाय व पाणी बचत' हा स्पर्धेचा विषय होता. यात ८३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि आपल्या कलागुणांसोबतच सामाजिक व पर्यावरणीय बांधिलकीही दाखवून दिली.

विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कागद वापरून आकर्षक आकाश कंदील तयार केले. या कंदिलांतून पाणी बचत, मृदसंवर्धन, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी संदेश मांडण्यात आले. 'आजचे संवर्धन, उद्याचे सुरक्षित भविष्य' आणि 'पाणी वाचवा, भविष्य घडवा' या घोषवाक्यांतून मुलांनी पाणी आणि मातीच्या संपत्तीचे महत्त्व अधोरेखित केले.

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कंदिलांची पाहणी केली. यात जलसंधारण अधिकारी संकेत इंगोले, जलसंधारण अधिकारी रवि भालेराव, लेखापरीक्षक मिलिंद सावदेकर आणि वरिष्ठ लिपिक अतुल करमनकर यांचा समावेश होता. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आणि जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचा योग्य वापर व पर्यावरण रक्षण याबद्दल मार्गदर्शन केले.

पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरवणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे आणि मातीची धूप रोखणे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही फक्त शासनाची किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींतून दिला. लहान वयातच पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव झाली, तर पुढे जबाबदार नागरिकांची पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. बाकलीवाल विद्यालयाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीचीही जाणीव जपली.

सहभागी विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्सचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दांभिवाल, पर्यवेक्षक किशोर राठोड आणि एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी अभिनंदन करून कौतुक केले. 'थेंब थेंब साठवूया, पाणीटंचाई टाळूया; माती वाचवूया, भविष्य घडवूया!' या प्रेरणादायी संदेशातून बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनी आकाश कंदिलांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा जागर घडवून आणला.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ