तुरीच्या फुलांवर काळ्या अळीचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रणाचा अतिरिक्त खर्च
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिरपूर जैन परिसरात तुरीची झाडे पिवळ्या फुलांनी बहरली असतानाच फुलांवर आणि कळ्यांवर अळीचा हल्ला सुरू झाला आहे. उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
शिरपूर जैन : यंदा पावसाच्या लहरीपणाचा आणि प्रतिकूल हवामानाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसत असतानाच, आता उरलेल्या तूर पिकावरही अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. शेतशिवारात तुरीची झाडे पिवळ्याधमक फुलांनी बहरली आहेत. पण या फुलांवर आणि कळ्यांवर अळीचा हल्ला सुरू झाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. शेतकऱ्यांच्या चिंतेत त्यामुळे आणखी भर पडली आहे.
तुरीला मोठ्या प्रमाणात फुले लागण्याचा काळ उत्पादनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. नेमक्या याच फुलोऱ्याच्या टप्प्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तुरीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अवस्थेत कीड वाढली, तर फुलांचे नुकसान होऊन शेंगा धरण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते, म्हणजेच उत्पादनाचे गणित बिघडण्याची भीती आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका सोयाबीनला बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची वाढ खुंटली. हळदीचे पीकही पाण्याअभावी अर्धवट स्थितीत आहे. अशा परिस्थितीत तूर चांगले उत्पादन देईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. काही भागांत तुरीची झाडे हिरवीगार दिसत असून त्यांना पिवळ्या फुलांचा मोठा बहर आला आहे.
मात्र याच बहरावर, म्हणजे फुलोरा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत, तुरीच्या पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. या किडी शेंगांना नुकसान पोहोचवत असल्यामुळे फूलगळती आणि शेंगगळतीची समस्या निर्माण होण्याची भीती आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. आता त्यांच्यासमोर कीड नियंत्रणाचा अतिरिक्त खर्च उभा राहिला आहे. महागडी कीटकनाशके फवारली तरी अपेक्षित परिणाम मिळेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
तूर पिकावरील अळीचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी गरज व्यक्त होत आहे. किडीची अचूक ओळख कशी करायची, प्रादुर्भावाची पातळी किती आहे आणि कीड व्यवस्थापन योग्य पद्धतीने कसे करायचे, याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळायला हवी. अनावश्यक आणि वारंवार कीटकनाशके फवारण्यापेक्षा कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.