विदर्भातील ५३५ गावांसाठी जलसंधारण उपक्रम, वाशिम प्रशासनाचा डब्ल्यूओटीआरशी करार
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विदर्भ जलसंवर्धन उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार झाला.
वाशिम जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. पाण्याची सुरक्षा, शेतीचे उत्पादन आणि ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढावे, या हेतूने जिल्हा प्रशासन आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्ल्यूओटीआर) यांच्यात शुक्रवारी सामंजस्य करार झाला. विदर्भ जलसंवर्धन उपक्रम प्रभावीपणे राबवता यावा, यासाठी हा करार करण्यात आला. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कराराच्या कागदपत्रांवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी, तर डब्ल्यूओटीआरच्या वतीने संस्थेचे कार्यकारी संचालक प्रकाश केसकर यांनी सही केली. मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरेंद्र वाघमारे, प्रादेशिक व्यवस्थापक शरद भनगडे, प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण वरकर आणि विजय बनसोडे हे यावेळी हजर होते. एचडीएफसी बँकेचे समूह प्रमुख राजकुमार पोजगे आणि जिल्हा व्यवस्थापक राम शर्मा हेही उपस्थित होते.
नैसर्गिक साधनसंपत्तीला पुन्हा उभारी देणे, शेतीचे उत्पादन वाढवणे आणि टिकाऊ उपजीविकेच्या संधी मजबूत करून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांमधल्या नऊ तालुक्यांतील ५३५ गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ३५० गावांमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजना एकत्र आणून, तर १८५ गावांमध्ये एचडीएफसी परिवर्तनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.
या कार्यक्रमात जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि शेतीला प्राधान्य दिले जाईल. डोंगरमाथ्यापासून दरीपर्यंत एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासाची कामे होणार आहेत. पावसाचे पाणी अडवणे, ते जमिनीत मुरवणे, भूजल पुनर्भरण वाढवणे, जलसाठ्याच्या संरचना मजबूत करणे आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणे, यावर भर राहील. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि सतत मार्गदर्शन देऊन सुधारित शेतीपद्धती स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
अंमलबजावणीत दोन्ही बाजूंची जबाबदारी वेगवेगळी आहे. जिल्हा प्रशासन विविध विभागांमध्ये समन्वय साधेल, प्रशासकीय सहकार्य देईल आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत करेल. डब्ल्यूओटीआर संस्था गावपातळीवर लोकसहभाग वाढवणे, जनजागृती, प्रशिक्षण, क्षमता बांधणी, सूक्ष्म नियोजन आणि ग्रामस्तरीय संस्थांचे सक्षमीकरण यासाठी सहकार्य करणार आहे.
कार्यक्रमाची प्रगती तपासण्यासाठी त्रैमासिक किंवा सहामाही बैठका घेतल्या जातील. हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी आहे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एचडीएफसी परिवर्तनच्या सहकार्याने या कार्यक्रमासाठी २० गावांची निवड झाली आहे. या गावांमधील ६ हजार ८२८ कुटुंबांतील ३१ हजार २९१ नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.