वगळलेल्या १३ कोटी मतदारांसाठी काँग्रेस देशभर मोहीम राबवणार, सोलंकी यांची धाराशिवमध्ये घोषणा
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी भरतसिंह सोलंकी यांनी धाराशिवमध्ये १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात देशव्यापी मोहिमेची घोषणा केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या १३ कोटी मतदारांना त्यांचा हक्क परत मिळवून देण्यासाठी काँग्रेस देशभरात मोहीम राबवणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी भरतसिंह सोलंकी यांनी २४ ऑक्टोबर रोजी धाराशिव येथे ही घोषणा केली. "लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मत वाचवा, देश वाचवा" या नावाने ही मोहीम १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात चालणार आहे.
धाराशिव शहरातील काँग्रेस भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सोलंकी बोलत होते. जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, लातूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, राजभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, धनंजय राऊत, विनोद वीर, अरविंद बेडगे, भैय्या निरफळ, आयुब पठाण, दयानंद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी तिथे हजर होते.
सोलंकी यांनी सांगितले की, काँग्रेसच्या काळात निवडणूक आयोगाचे आयुक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत नेमले जात होते. भाजप सरकारने ती पद्धत रद्द केली आणि आता ही नेमणूक गृह मंत्रालयातर्फे केली जाते, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नेमलेल्या ज्ञानेश कुमार यांना हाताशी धरून देशातील १३ कोटी मतदारांना यादीतून वगळण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. या लोकांना संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्कापासून दूर लोटले गेले, असेही ते म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप निवडून येतो, असा आरोप करत सोलंकी म्हणाले की, भाजपने ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीत घोटाळे केले आहेत. एसआयआरमध्ये ६२ लाख लोकांना वगळण्यात आले, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांना मतदानाच्या स्वातंत्र्यापासून दूर लोटण्याचे महापाप भाजपने केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.
संविधानाने नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे, पण देशाच्या स्वातंत्र्याशी किंवा नागरिकांच्या स्वातंत्र्याशी भाजपला काही देणेघेणे नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केली. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जुन्या मतदारांनाही पुन्हा नव्याने नोंदणी करणे बंधनकारक केले आहे, असे सोलंकी म्हणाले. अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि सुभाष चंद्र बोस यांच्या नातवाचेही नाव यादीतून वगळले गेले, असे त्यांनी सांगितले. ही मतचोरी हरियाणापासून पकडली गेली, असेही ते म्हणाले. ज्ञानेश कुमार यांच्या दोन सहकाऱ्यांनी फक्त १० दिवसांत १४ वेळा त्यांच्या निर्णयाला आव्हान दिले, असा दावाही त्यांनी केला.
मोदी आणि शहा हे ज्ञानेश कुमार यांना ताकद देत आहेत, असा आरोप सोलंकी यांनी केला. २०१४ मध्ये लोकपाल आणण्याच्या नावाखाली अण्णा हजारे यांच्यामार्फत देशभर गोंधळ घालण्यात आला, असे ते म्हणाले. सत्तेवर आल्यानंतर भाजपने लोकपाल बिल का आणले नाही, असा सवालही त्यांनी विचारला. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येताच अमित शहा यांच्या सांगण्यावरून सर्व मुख्य अधिकाऱ्यांच्या जागी त्यांच्या मर्जीतले अधिकारी नेमले गेले, असाही आरोप त्यांनी केला.
एसआयआरऐवजी एसएसआर कार्यक्रम देशातील १७ राज्यांमध्ये तयार करण्यात आला आहे, असे सोलंकी यांनी सांगितले. येत्या काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार असून तिथे भाजपचा निश्चित पराभव होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. वगळलेले १३ कोटी मतदार नेमके गेले कुठे आणि त्यांना का वगळले, असा प्रश्न विचारत ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष जिल्हा, तालुका, पंचायत समिती आणि गावनिहाय बीएलए-२ नेमणार आहे. हे प्रतिनिधी वगळलेल्या तसेच नव्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट करून ती यादी बीएलओकडे देतील.
या कामासाठी रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या दोन महिन्यांत जनजागृती केली जाणार आहे. देशभरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यात सहभागी होतील, असे सोलंकी यांनी आवर्जून सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.