पुण्यातील टेबल टेनिस स्पर्धेत शौरेन सोमणला १७ व १९ वर्षांखालील गटात दुहेरी विजेतेपद
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या जिल्हा मानांकन स्पर्धेत शौरेन सोमणने १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या गटात बाजी मारली. शगुन गणेशे, दिया शिंदे आणि रोहिंटन तोडीवाला यांनीही आपापल्या गटात विजेतेपद मिळवले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे प्रभात रोड येथील सिम्बायोसिस स्कूलमध्ये बालुफ ऑटोमेशन करंडक डॉ. सतीश ठिगळे मेमोरियल पाचवी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शौरेन सोमणने १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या दोन्ही गटांत विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट पटकावला. शगुन गणेशे, दिया शिंदे आणि रोहिंटन तोडीवाला यांनीही आपापल्या गटात विजेतेपद जिंकले.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित शौरेनने चौथ्या मानांकित शारंग गवळीला १३-११, ११-४, ११-६ अशा सरळ गेममध्ये हरवले. उपांत्य फेरीत शौरेनने दुसऱ्या मानांकित अनुज फुलसुंदरवर ११-७, ११-७, ८-११, ११-८ असा विजय मिळवला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात शारंग गवळीने वरदान कोलतेला ११-६, ११-८, ११-८ असे हरवले होते.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित दिया शिंदेने अंतिम सामन्यात अहाना गोडबोलेला ११-९, १०-१२, ९-११, ११-८, ११-८ अशा चुरशीच्या लढतीत हरवून विजेतेपद मिळवले. उपांत्य फेरीत दियाने स्पृहा बोरगावकरचा ११-५, ११-३, ११-३ असा पराभव केला होता. अहाना गोडबोलेने मेधा कोत्राला ८-११, ११-७, १५-१७, ११-९, ११-७ असे हरवून अंतिम फेरी गाठली होती. दिया शिंदे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकते आणि शारदा टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक दीपेश अभ्यंकर व मकरंद साने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटाचा अंतिम सामना सात गेमपर्यंत रंगला. चौथ्या मानांकित शौरेन सोमणने तिसऱ्या मानांकित निशाद लेलेला ९-११, ११-८, १०-१२, ११-५, ६-११, १३-११, ११-९ असे हरवून या स्पर्धेतील दुसरे विजेतेपद मिळवले. उपांत्य फेरीत शौरेनने अव्वल मानांकित अनुज फुलसुंदरचा ११-८, ११-७, ११-५ असा पराभव केला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात निशाद लेलेने स्वरूप भाडळकरला ११-७, ११-५, ११-७ असे हरवले होते. शौरेन एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये ईसीएसच्या पहिल्या वर्षात शिकतो आणि एम्स अकादमीत प्रशिक्षक नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
११ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित शगुन गणेशेने दुसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धनला ५-११, ११-९, ११-७, ११-७ असे हरवून विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत शगुनने अद्विती पाटीलवर ११-४, ११-९, ११-६ असा विजय मिळवला होता, तर शरण्या पटवर्धनने मायरा शर्माचा ११-२, १२-१०, ११-६ असा पराभव केला होता. शगुन माऊंट लिटेरा स्कूलमध्ये पाचवीत शिकते आणि चॅम्पियन्स टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक तेहसीन अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
६० वर्षांवरील प्रौढ गटात अव्वल मानांकित रोहिंटन तोडीवालाने प्रदीप गुप्ताला ११-७, ५-११, ११-७, ९-११, ११-९ असे हरवून विजेतेपद मिळवले. उपांत्य फेरीत रोहिंटनने रवींद्र कुलकर्णीचा १३-१५, ११-५, ११-४, ६-११, ११-७ असा पराभव केला होता. प्रदीप गुप्ताने दुसऱ्या उपांत्य सामन्यात हरीश साळवीला ५-११, ११-९, ७-११, ११-८, ११-६ असे हरवले होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.