मराठवाडा पदवीधरमध्ये सतीश चव्हाण पराभूत; मिटकरी म्हणतात, आत्मपरीक्षण करा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालानंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करून पक्षातील प्रत्येक स्तराने आत्मपरीक्षण करावे, असे म्हटले आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. महायुतीने पाचपैकी तीन जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीने दोन जागा जिंकल्या. यातील एका जागेवर थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रतापसिंह पाटील उमेदवार होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण रिंगणात होते. या लढतीत सतीश चव्हाण यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये निराशा आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यानंतर आता माजी आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करून पक्षाला घरचा अहेर दिला आहे.
अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, निवडणुकीत निकाल पक्षाच्या बाजूने लागला तर श्रेय घेण्यासाठी पुढे येणारे आणि परिस्थिती प्रतिकूल असली की जबाबदारी झटकणारे राजकारण आता थांबले पाहिजे. पक्षाच्या हातातून राजकीय संधी निसटत असताना नेमकी चूक कुठे झाली, कोणत्या स्तरावर संवाद थांबला आणि संभाव्य राजकीय ताकद पक्षाबाहेर का गेली, याची उत्तरे शोधली पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे. नेतृत्वाचा सन्मान फक्त व्यासपीठावर घोषणा देऊन होत नाही, तर नेतृत्वाचे निर्णय जमिनीवर यशस्वी करून दाखवावे लागतात, असे मिटकरी यांचे म्हणणे आहे.
हर्षदा जाधव-देशमुख आणि किरण सरनाईक यांच्या विजयाचा उल्लेख करून मिटकरी यांनी म्हटले की, यातून राष्ट्रवादी काँग्रेससमोर एक महत्त्वाचा धडा आला आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या सक्षम व्यक्तींना वेळेत संवाद, योग्य संधी आणि विश्वास दिला नाही, तर त्या स्वतःचा मार्ग तयार करतात. त्यांच्या विजयाचे विश्लेषण करण्यापेक्षा त्या पक्षापासून दूर का गेल्या, याचे आत्मपरीक्षण करणे जास्त महत्त्वाचे आहे, असे म्हणत मिटकरी यांनी एकप्रकारे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना चिमटा काढला आहे.
आज गरज दोषारोपांची नाही, तर जबाबदारी निश्चित करण्याची आहे, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. सुनेत्रावहिनींचे नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी पक्षातील प्रत्येक स्तराने आत्मपरीक्षण करावे, अन्यथा संघटनात्मक त्रुटींची किंमत पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मोजावी लागू शकते, असे त्यांनी म्हटले. पक्षाचे नुकसान झाल्यानंतर हात झटकणे सोपे असते, पण नुकसान होऊ न देणे हीच खऱ्या नेतृत्वाची कसोटी असते, असेही मिटकरी यांचे म्हणणे आहे.
प्रफुल पटेल यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया दिली होती. आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहे, असे त्यांनी म्हटले. लोकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल, असे पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे प्रफुल पटेल यांनी नाव न घेता थेट पक्षनेतृत्वालाच जाहीरपणे सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.