शरद पवार यांच्या भेटीला नेत्यांची रीघ, पार्थ पवारही आले; अमोल कोल्हे म्हणतात विलीनीकरणावर चर्चा नाही
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. खासदार अमोल कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार ही दिवाळीची भेट होती आणि विलीनीकरणावर चर्चा झाली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यापासून राज्यातील नेते त्यांना भेटायला गर्दी करत आहेत. आज त्यांना भेटणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे होते. अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.
या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "साहेबांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ही साहेबांच्या प्रकृतीची चौकशी होती. त्यांची प्रकृती अगदी छान आहे, त्यामुळे त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. दिवाळीनिमित्त ही भेट होणारच होती. गप्पांमध्ये एकापाठोपाठ एक विषय निघत गेले आणि त्यामुळे गप्पा रंगल्या. दिवाळीनिमित्तच आम्ही सर्वजण साहेबांना भेटलो."
कोल्हे यांनी पुढे सांगितले, "साहेबांची प्रकृती छान आहे. महाराष्ट्रात साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा आनंद द्विगुणित व्हावा अशीही बातमी आहे. मात्र पार्थ पवार यांच्याशी माझी भेट झाली नाही, मला तर ते दिसले नाहीत. माझ्या साहेबांशी गप्पा झाल्या. विलीनीकरणाच्या चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहेत. या बातम्यांबाबत काहीही चर्चा झाली नाही. आत सर्व ज्येष्ठ नेते एकत्र होते आणि गप्पांची मैफील रंगली होती."
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे. सुनील तटकरे यांचे विधान आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व प्रफुल पटेल यांनी घेतलेली शरद पवार यांची भेट, या घडामोडींमुळे विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. आता पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके काय सुरू आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.