शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

घाटकोपरमध्ये कुकरेजा पॅलेसच्या २३ व्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल

घाटकोपरमध्ये कुकरेजा पॅलेसच्या २३ व्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 शहर डेस्क

घाटकोपर पूर्वेतील २५ मजली निवासी इमारतीत शुक्रवारी संध्याकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार आग नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबईतील घाटकोपर पूर्व भागात शुक्रवारी संध्याकाळी एका निवासी इमारतीला भीषण आग लागली. कुकरेजा पॅलेस या २५ मजली इमारतीच्या २३ व्या मजल्यावर ही आग लागली आणि त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

मुंबई अग्निशमन दलाच्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी ७:५६ च्या सुमारास आगीचा कॉल आला. दलाचे जवान रात्री ८:१५ वाजता घटनास्थळी पोहोचले आणि रात्री ८:३० वाजता ही लेव्हल १ ची आग असल्याचे जाहीर करण्यात आले. ही इमारत घाटकोपर पूर्वेतील पंत नगर भागात वल्लभ बाग लेनवर आहे. रुग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि आपत्कालीन वाहने तातडीने तिकडे पाठवण्यात आली.

घटनास्थळावरील एका व्हिडिओमध्ये इमारतीच्या वरच्या मजल्यांचा एक भाग प्रचंड आगीच्या ज्वाळांनी वेढलेला दिसतो. रात्रीच्या आकाशात काळ्या धुराचे लोट पसरत होते. अनेक खिडक्यांमधून आग बाहेर पडताना या दृश्यांमध्ये दिसत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवान, मुंबई पोलीस, अदानी, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि वॉर्डचे कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.

अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग सध्या नियंत्रणात आहे आणि आतापर्यंत कोणाचाही जीव गेलेला नाही किंवा कोणी जखमी झाल्याचे समोर आलेले नाही.

या घटनेबद्दल आमदार पराग शाह म्हणाले की, मजुरांना आगीची थोडी झळ बसली आहे, पण आता आग आटोक्यात आली आहे. प्रत्येक बिल्डिंगची फायर फायटिंग यंत्रणा मजबूत असली पाहिजे, असे ते म्हणाले. आजची आग फटाक्यांमुळे लागलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र फटाके वाजवताना सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

महापौर रितू तावडे म्हणाल्या की, आग लागण्याची ही घटना दुर्दैवी आहे. आग लागली तेव्हा घरात आई आणि मुलगा तसेच काही कामगार होते. सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही. अग्निशमन दलाची टीम आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्वांनी फटाक्यांबाबत सावधगिरी बाळगावी, अशी विनंती त्यांनी केली. दिवाळीचा सण आहे, त्यामुळे घरात लायटिंग किंवा इतर काम सुरू असेल, तर घरातील एका माणसाने तिथे लक्ष ठेवण्यासाठी थांबले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. लोकांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे, असेही महापौर तावडे म्हणाल्या.

#मुंबई#शहर#PT24#Civic#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ