कॉम्प्युटर क्लासनंतर घरी निघालेल्या साहिलचा लोकलच्या धडकेत मृत्यू; रेल्वेच्या गलथान कारभारामुळे गेला
मध्य रेल्वेची लोकल सेवा दिवसभर कोलमडल्याने तीन प्रवाशांचा जीव गेला. भांडुपमधील २२ वर्षीय साहिल थिटे याच्या नातेवाईकांनी रेल्वे प्रशासनावर आरोप केला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे लोकल. चाकरमान्यांसाठी ती रोजच्या प्रवासाचा आधार आहे. मध्य रेल्वेची ही सेवा आज दिवसभर कोलमडली होती. सकाळी १० वाजल्यापासून गाड्या विस्कळीत झाल्या आणि प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. तब्बल ९ तासांनंतर सेवा सुरळीत करण्यात रेल्वेला यश आले. पण तोपर्यंत या खोळंब्यामुळे तीन प्रवाशांचा नाहक जीव गेला होता.
त्यातला एक भांडुपमधला २२ वर्षांचा साहिल थिटे. दुसऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू विक्रोळीत झाला. या मृत्यूला रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप साहिलच्या नातेवाईकांनी केला आहे.
साहिल भांडुपमध्ये राहत होता. त्याला दोन बहिणी आहेत. यंदाच्या वर्षी तो बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. ठाण्यातून कॉम्प्युटर क्लास करून तो घरी निघाला होता. भांडुपमध्ये चार नंबरच्या फलाटावरून पलीकडे जात असताना लोकलने त्याला धडक दिली. तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. लोकल खोळंब्यामुळे गाडीतून उतरून तो रुळावरून पायी जात होता, ही घटना भांडुप रेल्वे स्टेशन परिसरात घडली.
ही घटना धक्कादायक आहे. हा मृत्यू रेल्वेच्या गलथान कारभारामुळे झाला, असा आरोप साहिलचे कुटुंब आणि मित्रमंडळी करत आहेत. त्यामुळे साहिलच्या कुटुंबाला सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत. रेल्वे प्रशासनाने त्याच्या कुटुंबाला भरपाई द्यावी, अशीही मागणी होत आहे.
साहिलच्या भावाने सांगितले, "जे झालं त्याला आम्ही, कुणीही बदलू शकत नाही. मात्र, आमच्या कुटुंबीयास मदत मिळावी." अशी मागणी त्यांनी केली आहे.
आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. मुंबई आणि उपनगरातील रेल्वे खोळंब्याचा मुंबईकरांना मोठा फटका बसला असून घाटकोपर ते विक्रोळी या लोकल मार्गावर हे दोघे दगावले. दोन्ही मृतदेह राजावाडी हॉस्पिटलमध्ये आणले गेले आहेत. सुरुवातीला पोलिसांना एकच मृतदेह असल्याचे कळले होते. पण घटनास्थळी गेल्यावर तिथे दुसरा मृतदेहही सापडला. या घटना नेमक्या कशा घडल्या, याची जास्त माहिती अजून मिळालेली नाही. आज गाड्या उशिराने धावत होत्या, त्यामुळे अनेक जण रुळावरून चालत जात होते आणि त्यातूनच या दुर्घटना घडल्या, अशी चर्चा आहे. एकूण दिवसभरात रेल्वे मार्गावर तीन निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला.
दरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे. रेल्वे रुळांवरून चालणे किंवा रूळ ओलांडणे टाळावे. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायचे असेल तर कृपया फूट ओव्हर ब्रिज (पादचारी पूल), एस्केलेटर किंवा लिफ्टचा वापर करावा, असे रेल्वेने सांगितले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.