मृत्यूची अफवा खोटी, 'चिकन लेग पीस मॅन' उल्हास कामटे जिवंत; चार दिवस चर्चेत
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या चर्चेनंतर उल्हास कामटे यांनी व्हिडीओ पोस्ट करून आपण जिवंत असल्याचं सांगितलं.
सोशल मीडियावर 'चिकन लेग पीस मॅन' म्हणून ओळखले जाणारे इन्फ्लूएन्सर उल्हास कामटे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र उल्हास कामटे यांनी स्वतःच एक व्हिडीओ पोस्ट करून आपण जिवंत असल्याचं सांगितलं. मृत्यूच्या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा आहेत आणि व्हायरल होणारा व्हिडीओ जुना आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
हे समजल्यावर त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या चार दिवसांपासून मीडियात आणि सोशल मीडियात त्यांचीच चर्चा आहे. मग हे उल्हास कामटे नेमके कोण आहेत आणि त्यांना एवढी प्रसिद्धी कशी मिळाली, ते पाहू.
अफवा कशी उठली, याची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली. उल्हास कामटे 'झाड फुंक' या हॉरर सिनेमाच्या प्रीमियरला गेले होते. खरं तर त्यांना हॉरर सिनेमांची भीती वाटते, म्हणून ते जाणं टाळत होते. पण मित्राने आग्रह केल्यामुळे ते सिनेमा पाहायला गेले. सिनेमातला एक भयावह सीन पाहिल्यावर ते इतके घाबरले की जागीच बेशुद्ध पडले. त्यांना पॅनिक अटॅक आला होता आणि त्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली.
मित्रांनी त्यांना तात्काळ कोकिला बेन रुग्णालयात नेलं. तिथे उपचार झाले आणि काही वेळाने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना हार्ट अटॅक नव्हे, तर एंग्झायटी अटॅक आला होता. रुग्णालयात नेताना कुणी तरी त्यांचा व्हिडीओ तयार केला होता. तोच व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि उल्हास यांच्या मृत्यूची अफवा उठली. त्यामुळे त्यांना खुलासा करावा लागला.
उल्हास कामटे हे लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि युट्यूबर आहेत. इंटरनेटवर त्यांना 'चिकन लेग पीस मॅन' या नावाने ओळखतात. खास अंदाजात चिकन आणि मटन खातानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात, त्यामुळेच त्यांना ही ओळख मिळाली.
2018मध्ये टिकटॉकवर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात ते चिकन लेग पीस खाताना आणि आपल्या विशिष्ट शैलीत बोलताना दिसतात. ही स्टाइल लोकांना इतकी आवडली की तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि ते रातोरात घराघरात पोहोचले.
त्यानंतर त्यांचे इतर व्हिडीओही प्रचंड व्हायरल होत गेले आणि त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. फूड ब्लॉगर म्हणून त्यांची ओळख तयार झाली. इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांनी घाटकोपरमध्ये 'चिकन लेग पीस' नावाचं रेस्टॉरंटही सुरू केलं आहे.
कमाईबद्दल सांगायचं तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते 3 ते 4 लाख रुपये कमावतात, असं सांगितलं जातं. सोशल मीडियावर त्यांचे 2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियाशिवाय मुंबईत त्यांची जिम आहे आणि इतर व्यवसायही आहेत. त्यांनी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध व्यक्तींसोबत कामही केलं आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.