विनेश फोगाट यांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाचे कुस्ती महासंघाला आदेश, उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कारणे दाखवा नोटीशीविरुद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. भारतीय कुस्ती महासंघाने दोन आठवड्यांत उत्तर द्यायचे आहे.
दिल्ली हायकोर्टाने कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्या प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाला (WFI) महत्त्वाचे आदेश दिले आहेत. विनेश फोगाट यांना जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीशीवर महासंघाने उत्तर द्यायचे आहे आणि त्यासाठी हायकोर्टाने दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.
विनेश फोगाट यांनी महासंघाने बजावलेल्या नोटीशीला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली आणि त्याच वेळी न्यायालयाने हे आदेश दिले.
विनेश यांनी कुस्ती महासंघाच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि त्यांना देण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या नोटीशीविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली होती. बाजू मांडताना त्यांनी महासंघ मनमानी आणि द्वेषपूर्ण कारवाई करत असल्याचा आरोप केल्याचे समजते. महासंघाने ९ मे आणि १७ जून रोजी त्यांना जारी केलेल्या दोन्ही कारणे दाखवा नोटीसही सूडबुद्धीच्या कारवाईचाच भाग असल्याचे याचिकेत म्हटले जात आहे.
महासंघाकडून होणारा हा सततचा त्रास आणि अनिश्चितता यांमुळे आपल्या खेळावर आणि मानसिक शांततेवर गंभीर परिणाम होत असल्याचे विनेश यांनी याचिकेत नमूद केल्याचे समोर आले आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर दिल्याचे समोर येत आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि विविध मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू मानसिक दृष्ट्या शांत आणि तणावमुक्त असणे अत्यंत आवश्यक असते, असे न्यायमूर्तींनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.
पुढच्या डिसेंबर महिन्यात आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विनेश यांना सहभागी व्हायचे आहे. मात्र महासंघाच्या या नोटीशीमुळे त्यांना ती संधी मिळणार का, हे पाहावे लागणार आहे. अशा प्रकारच्या अनिश्चिततेचा आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील त्यांची पात्रता, नामांकन आणि प्रत्यक्ष सहभाग यांवर थेट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या जरी या नोटीशीमुळे त्यांच्या खेळण्यावर थेट बंदी आलेली नसली, तरी भविष्यातील महत्त्वाच्या स्पर्धांआधी महासंघ अचानक कोणताही प्रतिकूल किंवा त्यांच्या विरोधातला निर्णय घेऊ शकतो, अशी गंभीर भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आता दोन आठवड्यांत महासंघ हायकोर्टात काय उत्तर देतो, याकडे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.