गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:09 IST

अमेरिकेने ९ भारतीय कुस्तीपटूंचा व्हिसा नाकारला, U23 जागतिक चॅम्पियनशिपपूर्वी मोठा धक्का

लास वेगासमध्ये १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या U23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपआधी अमेरिकन दूतावासाने भारताच्या ९ कुस्तीपटूंचा व्हिसा फेटाळला आहे, त्यात नेहा सांगवानचाही समावेश आहे.

अमेरिकेने ९ भारतीय कुस्तीपटूंचा व्हिसा नाकारला, U23 जागतिक चॅम्पियनशिपपूर्वी मोठा धक्का छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अमेरिकेतील लास वेगास येथे १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान U23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप होणार आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्याआधीच भारताच्या ९ कुस्तीपटूंना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन दूतावासाने त्यांचा व्हिसा नाकारला आहे.

या स्पर्धेत उतरण्यासाठी भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासात व्हिसासाठी अर्ज केला होता. ७ ऑक्टोबर रोजी खेळाडूंना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मुलाखत झाल्यानंतर दूतावासाने ९ जणांचा व्हिसा फेटाळला आणि त्यासाठी कोणतेही स्पष्ट कारण दिले नाही. एवढेच नाही, तर त्या खेळाडूंचे पासपोर्टही त्यांना परत देण्यात आले आहेत. म्हणजे अर्ज करणाऱ्या खेळाडूंपैकी या ९ जणांना आता अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळालेली नाही.

व्हिसा नाकारलेल्या खेळाडूंमध्ये नेहा सांगवान हिचा समावेश आहे. ती २०२४ ची U17 वर्ल्ड चॅम्पियन असलेली स्टार महिला मल्ल आहे. देशासाठी जागतिक स्तरावर सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूलाच व्हिसा नाकारला गेल्याने क्रीडा जगतात तीव्र आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. अगदी ऐनवेळी कुस्तीपटूंचा व्हिसा नाकारला गेल्याने भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत भारताचे आव्हान खडतर झाल्याचे म्हटले जात आहे.

व्हिसा नाकारण्यामागचे कारण काय, याबद्दल काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. अर्जदारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी असणे आणि त्यांच्याकडे नियमित रोजगार नसणे, हे मुख्य कारण असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मुख्य आणि अधिकृत कारण अजून समजू शकलेले नाही.

या घडामोडीनंतर भारतीय कुस्ती महासंघाने तातडीने पावले उचलली आहेत. महासंघाने नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधला असून, दूतावासाला अधिकृत पत्र लिहून या निर्णयावर फेरविचार करण्याची नम्र विनंती केली आहे. ज्या कुस्तीपटूंची व्हिसा मुलाखत ८ ऑक्टोबर रोजी ठरलेली आहे, त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन व्हिसा मंजूर करावा, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आता क्रीडा मंत्रालय आणि भारतीय कुस्ती महासंघ अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधून आपत्कालीन व्हिसा मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्पर्धेला फारसा वेळ उरलेला नसल्याने या प्रयत्नांना किती यश मिळते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ