व्हाट्सऐप कॉल वारंवार डिस्क्नेक्ट होतोय? आवाजात अडथळे येताहेत? या ट्रिक्स आत्ताच वापरून बघा
व्हाट्सऐप कॉलिंग करताना आवाज तुटत असेल किंवा कॉल मध्येच बंद पडत असेल, तर लगेच फोन बिघडलाय असं समजू नका. इंटरनेट कनेक्शन, अॅपचं व्हर्जन, मायक्रोफोन आणि ब्लूटूथ कनेक्शन तपासण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स.
व्हाट्सऐप हे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म फक्त चॅटिंगसाठी नाही तर व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलसाठीही मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. व्हाट्सऐपवरून व्हिडीओ कॉल किंवा व्हॉईस कॉल करणं ही आता अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. पण अनेकदा कॉल करताना समोरच्याचा आवाज नीट ऐकू येत नाही किंवा कॉल मध्येच तुटतो, अशा तक्रारी युजर्सकडून केल्या जातात. अशावेळी लगेच फोनमध्येच बिघाड आहे असं समजण्याची गरज नाही. इंटरनेट कनेक्शन, अॅपचं सेटिंग किंवा मायक्रोफोनमध्ये असलेली समस्या यामुळेही कॉलिंगमध्ये अडथळे येऊ शकतात. अशा वेळी कोणत्या गोष्टी तपासाव्यात, याबद्दल काही उपयुक्त ट्रिक्स आहेत.
सगळ्यात आधी इंटरनेट कनेक्शन तपासणं गरजेचं आहे. व्हाट्सऐप कॉलची क्वालिटी मुख्यतः इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून असते. वायफाय कनेक्शन कमकुवत असेल किंवा मोबाईल डेटा नीट काम करत नसेल, तर कॉलची क्वालिटी खराब होते. अशावेळी इंटरनेट बंद करून पुन्हा सुरू करून बघावं. गरज वाटल्यास मोबाईल डेटावरून वायफायवर किंवा वायफायवरून मोबाईल डेटावर स्विच करून कॉल करून बघावा. यामुळे कनेक्शन कोणत्या बाजूने कमकुवत आहे, हे लक्षात येण्यास मदत होते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अॅप अपडेट करणं. अनेकदा जुनं व्हर्जन वापरत असल्यामुळे कॉलिंगमध्ये अडचणी येतात. त्यामुळे गूगल प्ले स्टोअर किंवा एप्पल अॅप स्टोअरवरून व्हाट्सऐप लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करून घ्यावं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कॉल करून बघावा. अॅप अपडेट केल्यानंतर आधीच्या व्हर्जनमधील तांत्रिक त्रुटी दूर झालेल्या असतात, त्यामुळे कॉलची क्वालिटी सुधारण्याची शक्यता असते.
फोनच्या मायक्रोफोन आणि स्पीकरमध्ये धूळ साचली असेल तरीही आवाजाची क्वालिटी बिघडू शकते. त्यामुळे स्पीकर आणि मायक्रोफोन स्वच्छ करणं गरजेचं आहे. मात्र स्वच्छता करताना कोणतीही टोकदार वस्तू वापरू नये, याची काळजी घ्यावी, कारण त्यामुळे स्पीकर किंवा मायक्रोफोनला इजा होऊ शकते.
ज्यांचा फोन ब्लूटूथ ईयरबड्स, हेडफोन किंवा कार सिस्टिमला कनेक्ट असतो, त्यांच्यासाठी हे कनेक्शन नीट आहे की नाही, हे तपासणंही महत्त्वाचं आहे. कनेक्शनमध्ये गडबड असेल तर कॉलमध्ये अडथळे येऊ शकतात. अशावेळी फोनचं ब्लूटूथ बंद करून पुन्हा सुरू करावं आणि ईयरबड्स, हेडफोन किंवा कार सिस्टिमला पुन्हा एकदा कनेक्ट करून बघावं. यामुळे आवाजाची समस्या सुटू शकते.
वर दिलेले उपाय करूनही समस्या सुटली नाही, तर व्हाट्सऐप बंद करून पुन्हा उघडून बघावं. तरीही अडचण कायम राहिली, तर स्मार्टफोन रिस्टार्ट करावा. कारण बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेल्या एखाद्या प्रोसेसमुळे किंवा सॉफ्टवेअरमधील एखाद्या गडबडीमुळेही कॉलिंगमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे या सोप्या पायऱ्या एकामागोमाग एक करून बघितल्यास व्हाट्सऐप कॉलिंगमधील अडथळे दूर होण्यास मदत होऊ शकते.