वर्धा पोलीस दलाची सप्टेंबरची गुन्हे आढावा बैठक, नवरात्र आणि सायबर जनजागृतीवर भर
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या उपस्थितीत वर्धा जिल्हा पोलीस दलाची मासिक गुन्हे आढावा बैठक झाली.
वर्धा जिल्हा पोलीस दलाची सप्टेंबर २०२६ महिन्याची मासिक गुन्हे आढावा बैठक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, येणाऱ्या सण-उत्सवांच्या काळातील प्रतिबंधक उपाय, सायबर सुरक्षा आणि पोलीस प्रशासकीय कामकाज यांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी पॉवरपॉइंट सादरीकरणातून (पीपीटी) विविध विषय मांडले आणि प्रशासकीय मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
नवरात्रोत्सवाबाबत वर्धा शहरचे पोलीस निरीक्षक चतरकर यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यात एकूण १२५६ देवींची प्रतिष्ठापना होणार असून त्या अनुषंगाने विशेष सतर्कता बाळगण्याचा आढावा घेण्यात आला. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे, वाहतुकीचे प्रभावी व्यवस्थापन, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणि मंडळांमधील गैरसमज टाळण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याचे सुचवण्यात आले. प्रत्येक मंडळात एक जबाबदार अधिकारी नेमण्यात आला असून समन्वयासाठी विशेष व्हाट्सऐप ग्रुप तयार करण्यात आला आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंमलदारांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी १ ते ३१ ऑक्टोबर या काळात राबवल्या जाणाऱ्या 'सायबर जनजागृती महिना' या उपक्रमाचा सविस्तर कार्य आराखडा मांडला. हा उपक्रम उद्घाटनापासून समारोपापर्यंत एकूण ७ टप्प्यांत होणार आहे.
आगामी काळात विविध पक्षांची आंदोलने होणार असल्याने विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले. आंदोलने हाताळताना योग्य ती काळजी आणि संयम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सोशल मीडियावर सातत्याने कडक नजर ठेवण्यास सांगण्यात आले.
अवैध धंदे, स्ट्रीट क्राईम, चेन स्नॅचिंग, जबर चोरी, वाहन चोरी आणि सराईत गुन्हेगार यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. दारूबंदी आणि एनडीपीएस (NDPS) अंतर्गत प्रभावी कारवाईवर विशेष भर देण्यात आला असून गुन्हेगारांवर सतत वचक ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सादरीकरणानंतर झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी काही महत्त्वाचे निर्देश दिले. कायदा व सुव्यवस्था (L&O) आणि महत्त्वाच्या कायदेविषयक मुद्द्यांवर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि शहर पोलीस निरीक्षक (City PI) यांनी एकत्र येऊन कार्यशाळा घ्याव्यात, असे त्यांनी सांगितले. दोषारोपपत्र मुदतीत कोर्टात सादर करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
अपघाती गुन्ह्यांचा तपास अत्यंत गांभीर्याने आणि शास्त्रीय पद्धतीने करून अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलीस अकार्यक्षमतेमुळे किंवा दिरंगाईमुळे कोणतीही 'सेशन कमिटेड केस' सुटू नये, याची विशेष काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले.
पोलीस स्टेशनचे वातावरण ताणतणावमुक्त आणि चांगले ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पोलीस कुटुंबांशी नियमित संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, असेही सांगण्यात आले.
बैठकीला वर्धा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे, विशेष शाखा आणि इतर संबंधित शाखांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले.