वर्धा : विकास पांडे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, नाशिकरोड कारागृहात रवानगी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इतवारा बाजार परिसरात राहणारा विकास सुरज पांडे (वय ३१) याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी वान्मथी सी. यांनी १६.१०.२०२५ रोजी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. त्यानुसार त्याला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याचा उल्लेख या परिसरातील कुख्यात गुंड असा केला आहे.
वर्धा (शहर) पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर विकास पांडे याच्याविरुद्ध २०२० पासून शरीराविरुद्धचे तसेच हत्यार कायद्यांतर्गत असे एकूण आठ गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांमध्ये प्राणघातक शस्त्र बाळगणे, शस्त्रासह शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणे आणि दुखापत करणे, साथीदारासह घरात घुसून खंडणी मागणे आणि अश्लील शिवीगाळ करून गंभीर दुखापत करणे यांचा समावेश आहे. अडवणूक करून हल्ला करणे, दुखापत करणे आणि नुकसान करणे हेही गुन्हे नोंद आहेत.
बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्रासह खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा त्यात आहे. त्या गुन्ह्यात MCOCA अन्वये कलम वाढवून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. याशिवाय जमाव जमवून दुखापत करणे, शस्त्रासह दगडफेक करून नुकसान करणे, शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणे, परिसरात दहशत निर्माण करणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणे असे गुन्हे नोंद आहेत. हे आठही गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. तो सतत गुन्हे करणारा गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्या दहशतीमुळे अनेक पीडित लोक त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार द्यायलाही धजावत नव्हते. त्यामुळे परिसरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडली होती आणि सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले होते. त्याच्याविरुद्ध कलम १२९ (ई) भारतीय नागरी सुरक्षा संहिता अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई आधीच करण्यात आली होती. पण अशा कारवाईलाही तो जुमानत नसल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर वर्धा (शहर) चे ठाणेदार यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफिया व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्फत जिल्हादंडाधिकारी वान्मथी सी. यांच्याकडे सादर झाला. त्याच्या सततच्या गुन्ह्यांची जिल्हादंडाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन स्थानबद्धतेचा आदेश काढला.
गेल्या एका वर्षात पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांच्यातील योग्य समन्वयामुळे एम.पी.डी.ए. कायद्यान्वये धडक कारवाई झाली आहे. अवैध दारू विक्रेते, दारू विक्रीसाठी पुरवठा करणारे विक्रेते, समाजातील धोकादायक गुंड प्रवृत्तीचे लोक आणि रेती माफिया यांच्या मनात धडकी भरली आहे. आपला नंबर पुढे लागेल का, या भीतीने गुन्हेगारी विश्वात चर्चा रंगत असल्याचे दिसून येते.
येणारे सण-उत्सव शांततेत पार पडावेत, या उद्देशाने अशा लोकांवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कठोर कारवाईचे पुन्हा संकेत जिल्हाधिकारी वान्मथी सी. आणि पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले आहेत. आकडेवारीनुसार २०२५ मध्ये एकूण १८ दारू विक्रेते, गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगार आणि रेती माफिया यांची एम.पी.डी.ए. अंतर्गत जेलमध्ये रवानगी झाली. २०२६ मध्ये आतापर्यंत ११ गुंड प्रवृत्तीच्या आणि समाजाला घातक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल महाडीक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा अमोल आत्राम आणि पोहवा आशिष महेशगौरी यांनी, तसेच वर्धा (शहर) पोलीस स्टेशनचे पो.नि. नागेशकुमार चतरकर, पोउपनि शरद गायकवाड, मपोहवा वैशाली करमनकर आणि मपोशि करिश्मा परचाके यांनी ती केली. दिनांक १७-१०-२०२६.