वानखेडेवरील ड्रोन शोचे दोन ड्रोन चर्चगेट स्टेशनवर कोसळले, एक प्रवासी गंभीर जखमी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या ड्रोन शोदरम्यान दोन ड्रोनचे नियंत्रण सुटले आणि ते चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कोसळले. या घटनेत एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी दोन्ही ड्रोन जप्त केले आहेत.
मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री एका भव्य ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. हा शो सुरू असतानाच अचानक मोठी दुर्घटना घडली. शो दरम्यान दोन ड्रोनचे नियंत्रण सुटले आणि ते भरधाव वेगाने चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेले. हे दोन्ही ड्रोन स्टेशनमधील प्लॅटफॉर्मवर कोसळले. त्या वेळी प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत उभा असलेला एक प्रवासी या घटनेत गंभीर जखमी झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चर्चगेट स्टेशनवर काही वेळ प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वानखेडे स्टेडियमवर एका नामांकित टेलिकॉम कंपनीने हा आकर्षक ड्रोन शो आयोजित केला होता. हजारो उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा हा शो सुरू असतानाच रात्री सुमारे ८:१० वाजेच्या सुमारास दोन ड्रोनवरील तांत्रिक नियंत्रण अचानक सुटले. स्टेडियमच्या बाहेर उडत गेलेले हे ड्रोन थेट शेजारच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या परिसरात शिरले.
त्यापैकी एक ड्रोन प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील विरारच्या दिशेकडील टोकावर जोरात आदळला. त्या वेळी प्लॅटफॉर्मवर उभे असलेले ३७ वर्षांचे प्रवासी हेमंत महोत्सवकर यांना या ड्रोनचा थेट आणि जोरदार फटका बसला. ड्रोन आदळल्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली आणि मोठा रक्तस्राव सुरू झाला.
स्टेशनवर अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावले. जखमी हेमंत महोत्सवकर यांना लगेच प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी जीटी (GT) रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्टेशन मास्टरने या घटनेप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपीला (GRP) रीतसर मेमो पाठवला आहे.
या अपघातानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही दुर्घटनाग्रस्त ड्रोन आपल्या ताब्यात घेतले आहेत. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रोन शोदरम्यान सुरक्षेचे कोणते नियम पाळले गेले नाहीत, ड्रोनवरील सिग्नल कसे तुटले आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमात तांत्रिक चुकीमुळे ड्रोन थेट गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर कसे पोहोचले, या सर्व प्रश्नांचा पोलीस आणि रेल्वे प्रशासन सखोल तपास करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.