शेतकरी आत्महत्येबाबतच्या वक्तव्याने संजय गायकवाड अडचणीत; शिवसेनेतून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या शेतकरी आत्महत्येबाबतच्या विधानावरून फडणवीस आणि शिंदे संतापले आहेत.
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या बोलण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही चांगलेच संतापल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गायकवाड यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि त्याच्याविरोधातील कोणतेही अवमानकारक विधान खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांना शिवसेनेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षातून निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत धक्कादायक विधान केले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत बोलताना ते म्हणाले होते, "शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल तर त्याने आमदार, खासदारांना पत्र पाठवावे, आम्ही सर्वजण मिळून त्याला मदत करू. मी माझ्या भाषणात नेहमी सांगतो, शेतकरी कुठलाही विचार न करता आत्महत्या करतात, जर कोणत्याही शेतकऱ्याने जीव दिला तर त्याच्या मयतीलाही कुणी जाऊ नये, कोणी नाही गेले म्हणजे त्यांना कळेल की आपली बॉडी जनावरे खातील मग तो जीव देणार नाही."
वाद वाढल्यावर गायकवाड यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. आपले बोलणे शेतकऱ्यांबद्दल नव्हते, तर अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांबद्दल होते, असा दावा त्यांनी केला. तरीही त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिंदे यांची शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवते. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीन दिल्या जातात, तर शेतकऱ्यांच्या मुलींना सायकलींचे वाटप केले जाते. शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागात अन्नधान्याचे १०० ट्रक मदतीसाठी पाठवल्याचा दावाही पक्षाकडून केला जात आहे. मात्र गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे.
आता एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका घेतात आणि संजय गायकवाड यांच्यावर प्रत्यक्षात निलंबनाची कारवाई होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.