शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:09 IST

पुण्यात एमपीएससी आंदोलनात विनापरवाना ड्रोन उडवला, पाच जणांवर गुन्हा दाखल

एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनादरम्यान परवानगी न घेता ड्रोनने चित्रीकरण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला गेला असून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.

पुण्यात एमपीएससी आंदोलनात विनापरवाना ड्रोन उडवला, पाच जणांवर गुन्हा दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान परवानगी न घेता ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरोधात नवीन गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आंदोलनाभोवती पोलिसांचा फास आवळला गेला आहे.

ड्रोनचालक दिगंबर भारत खरे यांच्यासह शिवराज मोरे, प्रमोद पाटील, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबले अशा पाच जणांवर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. हे पाचही जण आता या गुन्ह्यात आरोपी आहेत.

५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एस. एम. जोशी पूल परिसरात आंदोलन सुरू असताना आकाशात एक ड्रोन विनापरवाना उडत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आंदोलनस्थळी गोपनीय माहितीसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी युवराज टेळे यांनी मागच्या बाजूला जाऊन पाहणी केली. तेव्हा जनरेटरजवळ उभे असलेले दिगंबर खरे रिमोटच्या मदतीने ड्रोन चालवत असल्याचे स्पष्ट झाले.

चौकशीदरम्यान हा ड्रोन उडवण्यासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. तसेच आरोपी प्रमोद पाटील, शिवराज मोरे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबले यांच्या सांगण्यावरून हे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा एक डीजीआई (DJI) ड्रोन कॅमेरा आणि १० हजार रुपये किमतीचा रिमोट कंट्रोलर, असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिकृत परवानग्या आणि कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचना देण्यात आली होती. तरीही ती सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे अखेर १० ऑक्टोबर रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शोभा तेली करत आहेत.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या या बहुचर्चित आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्तुळात आणि राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. एकीकडे मागण्यांसाठी लढा सुरू असताना, दुसरीकडे कायदेशीर कारवाईचा ससेमिरा मागे लागल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणींत भर पडली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ