गुन्ह्यांचा थरार आता मराठीत! 'क्राइम पेट्रोल मराठी'चे सूत्रसंचालन करणार उपेंद्र लिमये
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली 'क्राइम पेट्रोल' ही मालिका आता मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या 'क्राइम पेट्रोल मराठी'चे सूत्रसंचालन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये करणार आहेत.
ही मालिका २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता ती सोनी मराठीवर आणि Sony LIV वर पाहता येईल. सजगता, सतर्कता आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश ही मालिका देणार आहे.
"चुकीच्या विचारांना करा DELETE आणि चांगले विचार करा VIRAL, कारण आता जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच!" हा संदेश घेऊन 'क्राइम पेट्रोल मराठी' प्रेक्षकांसमोर येणार आहे. या संदेशातून प्रेक्षकांना रोजच्या आयुष्यात अधिक सजग राहण्याचे आवाहन केले जाणार आहे.
आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे, ते डोळसपणे पाहणे, प्रश्न विचारणे आणि विचार करून निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या मालिकेतून अधोरेखित होईल. सत्य घटनांवर आधारित कथांमधून गुन्ह्यांचा वेध घेतला जाईल. त्याचबरोबर धोक्याचे संकेत ओळखणे आणि कुणावरही विश्वास ठेवताना खबरदारी घेणे किती गरजेचे आहे, याची जाणीवही प्रेक्षकांना करून दिली जाईल.
या मालिकेशी जोडले गेल्याबद्दल उपेंद्र लिमये म्हणाले, "एक अभिनेता म्हणून कथांचा लोकांच्या मनावर किती प्रभाव पडू शकतो, हे मी पाहिलं आहे. 'क्राइम पेट्रोल मराठी'च्या माध्यमातून प्रेक्षकांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि सतर्क राहायला प्रोत्साहित करण्याचा माझा प्रयत्न असेल. आज कोणतीही गोष्ट काही क्षणांत व्हायरल होते."
ते पुढे म्हणाले, "अशा वेळी जनजागृती करणारे संदेश आणि चांगले विचारही लोकांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. सोनी मराठीसोबत हा संदेश पुढे घेऊन जाताना मला आनंद होत आहे. कारण अधिक सुरक्षित समाज घडवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे."
तुम्हाला सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरीज आवडत असतील आणि त्यातून काहीतरी शिकायला मिळावं असं वाटत असेल, तर ही मालिका चुकवू नका. २६ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता ती सोनी मराठीवर पाहता येईल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.