सणासुदीत डाळी महागल्या; चाळीसगावात मठ १८० रुपये किलोपर्यंत
सणासुदीच्या तोंडावर चाळीसगावच्या बाजारात डाळींचे दर शंभरीपार गेले असून तूरडाळ १५० रुपये किलो झाली आहे. गावरान मठाचे दर १७० ते १८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चाळीसगाव (जि. जळगाव) : सणासुदीचे दिवस तोंडावर आले असतानाच महागाईचा भडका उडाला आहे. चाळीसगावच्या बाजारात डाळींचे दर शंभरीपार गेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. राज्यात एकीकडे दुष्काळाचे सावट आहे, तर दुसरीकडे महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
बाजारभावानुसार चणाडाळ १०० रुपये किलो झाली आहे. मूगडाळ १३० रुपये, तूरडाळ १५० रुपये, चवळी डाळ १४० रुपये, तर मसूर डाळ १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. गावरान मठाचे दर १७० ते १८० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. बाजारात डाळींचे दर शंभरीपार गेल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.
डाळींबरोबरच धान्याच्या दरवाढीचाही फटका बसत आहे. ज्वारी, बाजरी आणि गव्हाचे दर ग्राहकांची चिंता वाढवत आहेत. गहू आणि लोकवन गहू यांचा दर प्रतिकिलो ३५ रुपये आहे, त्यामुळे कुटुंबांच्या महिन्याच्या किराणा खर्चात वाढ होत आहे. तांदळाच्या दरवाढीमुळेही बजेट बिघडत असल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत.
एकीकडे उत्पन्न मर्यादित आहे, तर दुसरीकडे रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. गहू, तांदूळ आणि विविध डाळींचे वाढलेले दर पाहून जगायचे तरी कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पूर्वी महिन्याच्या सुरुवातीलाच किराणा भरून ठेवणाऱ्या कुटुंबांना आता प्रत्येक वस्तूचे प्रमाण ठरवून खरेदी करावी लागत आहे. महागाईमुळे काही कुटुंबांना दैनंदिन गरजांमध्ये कपात करावी लागत असून सणासुदीचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत अन्नधान्याच्या किमती वाढल्या, तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होतो. वाढत्या महागाईचा भार सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. बाजारातील दरांवर नियंत्रण ठेवणे, साठेबाजी आणि कृत्रिम दरवाढीवर लक्ष ठेवणे, तसेच गरजू कुटुंबांना परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांची नाराजी वाढत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने बाजारभावांवर लक्ष ठेवावे आणि महागाई नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.