शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

त्र्यंबकेश्वरच्या सापगावात १८ वर्षांच्या तरुणाचा चाकूने खून; प्रेयसीच्या भावाला पोलिसांनी केली अटक

त्र्यंबकेश्वरच्या सापगावात १८ वर्षांच्या तरुणाचा चाकूने खून; प्रेयसीच्या भावाला पोलिसांनी केली अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात सापगाव येथे आर्यन कांबळे या १८ वर्षांच्या तरुणाचा धारदार चाकूने वार करून खून झाला. याप्रकरणी आदित्य मोंढे (वय २०) याला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे १८ वर्षांच्या एका तरुणाचा धारदार चाकूने सपासप वार करून खून झाल्याची घटना समोर आली आहे. आर्यन सोमनाथ कांबळे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्ग रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आदित्य एकनाथ मोंढे (वय २०, रा. शिरसगाव) याला अटक केली आहे. आदित्य हा आर्यनशी प्रेमसंबंध असलेल्या तरुणीचा भाऊ आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आर्यन आणि आरोपीची बहीण यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे, दोघेही एकाच समाजाचे होते, तरीही मुलीच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते. या प्रेमसंबंधामुळे कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसतो, अशा चुकीच्या समजुतीतून आरोपी आदित्यच्या मनात आर्यनबद्दल तीव्र राग होता, असे पोलिसांच्या माहितीत म्हटले आहे. याआधीही आर्यन आणि आदित्य यांच्यात वाद झाले होते, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आदित्यने बहिणीसोबतच्या संबंधांबद्दल चर्चा करायची आहे, असे सांगून आर्यनला सापगाव येथील स्मशानभूमीजवळ भेटायला बोलावले. दोघे तिथे पोहोचताच त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला. त्या वेळी आदित्यने आपल्याजवळ असलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि आर्यनच्या पोटावर, गळ्यावर, हातावर आणि छातीवर सपासप वार केले, असा आरोप आहे.

या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वेगाने तपास सुरू केला. अवघ्या काही वेळातच पोलिसांनी आरोपी आदित्य मोंढे याला अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत. आर्यनच्या मृत्यूमुळे सापगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ