निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वे अधिकाऱ्याच्या खात्यातून ३२.४२ लाख सायबर भामट्यांनी उडवले
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपुरात रेल्वेतून ३१ ऑक्टोबरला निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला उम्मीद मेडिकल कार्डच्या नावाखाली एपीके फाइल पाठवण्यात आली आणि बँक खात्यातील ३२ लाख ४२ हजार १५० रुपये काढले गेले. सायबर पोलीस तपास करत आहेत.
नागपूर : रेल्वेतून ३१ ऑक्टोबरला निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याची सायबर गुन्हेगारांनी मोठी फसवणूक केली आहे. निवृत्तीनंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या बँक खात्यातून ३२ लाख ४२ हजार रुपये काढले गेले. या प्रकारामुळे रेल्वे विभागातही खळबळ उडाली आहे.
अमरावती मार्ग परिसरात राहणारे ६० वर्षांचे रविंद्र सिंह बनाफर रेल्वेत असिस्टंट वर्क ऑफिसर या पदावर काम करत होते. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उम्मीद मेडिकल कार्ड दिले जाते. त्याच्या मदतीने ते आणि त्यांचे कुटुंबीय रेल्वेशी संबंधित रुग्णालयांत उपचार घेऊ शकतात.
२ नोव्हेंबरच्या सकाळी बनाफर यांच्या मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला रेल्वेचा एपीओ अधिकारी हेमराज विश्वकर्मा असल्याचे सांगितले. तुमचे उम्मीद मेडिकल कार्ड अपडेट करायचे आहे, त्यासाठी मोबाइलवर एक ॲप पाठवत आहे, ते डाउनलोड करावे लागेल, असे त्याने म्हटले.
आपण रेल्वेचे अधिकारी आहोत असा विश्वास देऊन या सायबर भामट्याने ॲपऐवजी एपीके फाइल पाठवली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बनाफर यांनी ती फाइल डाउनलोड केली. त्यानंतर सायबर गुन्हेगारांना त्यांच्या मोबाइलमधील महत्त्वाच्या माहितीपर्यंत पोहोचता आले. विश्वास टिकवण्यासाठी त्या भामट्याने त्यांच्याकडून कुटुंबीयांची माहिती, मोबाइल नंबर आणि आधार नंबरही विचारून घेतला.
याच दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून ३२ लाख ४२ हजार १५० रुपये काढून घेतले गेले. ही रक्कम त्यांना निवृत्तीनंतर रेल्वेकडून मिळाली होती. आयुष्यभर नोकरी केल्यानंतर मिळालेली सगळी जमापुंजी एका झटक्यात गायब झाल्याने बनाफर यांना मोठा धक्का बसला. त्यांनी लगेच पोलिसांकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी फसवणूक आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रेल्वेतील कुणाचा हात असल्याचा संशय
या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे बनाफर ३१ ऑक्टोबरला निवृत्त झाले आणि अवघ्या दोन दिवसांनी सायबर गुन्हेगारांनी मेडिकल कार्ड अपडेट करण्याचे कारण सांगून त्यांना फोन केला. त्यामुळे रेल्वेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती या गुन्हेगारांना आधीच मिळत असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या टोळीत रेल्वेशी संबंधित कुणाची भूमिका असण्याची शक्यताही फेटाळता येत नाही. मात्र त्याची पुष्टी पोलिसांच्या तपासानंतरच होऊ शकेल.
उम्मीद मेडिकल कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली रेल्वेच्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते. अनेक जण या भामट्यांच्या बोलण्याला फसले नाहीत, पण बनाफर यांना निवृत्तीनंतर लगेचच आयुष्यभराची कमाई गमवावी लागली. एपीके फाइलद्वारे मोबाइलमध्ये शिरून बँक खात्यातील पैसे काढण्याचा हा पहिला प्रकार नाही. तरीही लोक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.