शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

बोथलीत जातीवरून अपमान केल्याची तक्रार, सावली पोलिसांत तीन महिलांवर गुन्हा दाखल

बोथलीत जातीवरून अपमान केल्याची तक्रार, सावली पोलिसांत तीन महिलांवर गुन्हा दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

चंद्रपूर जिल्ह्यातील बोथली येथे शारदा उत्सवादरम्यान जातीवरून भेदभाव आणि अपमान झाल्याच्या तक्रारीवरून सावली पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोथली येथे शारदा उत्सवादरम्यान जातीवरून भेदभाव आणि सार्वजनिक ठिकाणी अपमान झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली गेली आहे. या तक्रारीवरून सावली पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बोथली येथील सौ. मिनाक्षी बापुजी पोवरे यांनी सावली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. फिर्यादीनुसार, गेल्या वर्षी सावली परिसरातील वॉर्ड क्रमांक ०२ मध्ये काही महिलांनी एकत्र येऊन संयुक्त शारदा महिला मंडळ स्थापन केले होते. त्यात फिर्यादी आणि मातंग समाजातील इतर महिलाही सहभागी झाल्या होत्या आणि उत्सव आनंदात साजरा झाला होता. यंदाही वॉर्डमध्ये शारदा देवीची स्थापना झाली. नेहमीप्रमाणे समाजातील महिलांनी वर्गणी गोळा करण्यापासून इतर कामांपर्यंत सक्रिय सहभाग घेतला.

वादाची सुरुवात २३ ऑक्टोबर २०२६ रोजी झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्या दिवशी संयुक्त शारदा महिला मंडळाने जेवणाचे आयोजन केले होते. मिनाक्षी पोवरे आणि इतर महिला स्वयंपाकासाठी गेल्या, तेव्हा कणिक मळणे, भाजी कापणे आणि पोळ्या करणे या कामांपासून त्यांना जाणूनबुजून दूर ठेवले गेले, असे त्यांच्या लक्षात आले. आनंदाचा दिवस असल्याने त्या वेळी त्यांनी काही बोलले नाही. मंडळाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी तांदूळ आणि लाह्या साफ करण्याचे काम पूर्ण केले.

पुढे २४ ऑक्टोबर २०२६ रोजी देवीचे विसर्जन झाले. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी मंडळाचा हिशोब करण्यासाठी देवीसमोरील रस्त्यावर बैठक बोलावण्यात आली. मंडळाचे पदाधिकारी आणि सुमारे ३० ते ३५ महिला तिथे हजर होत्या. आमच्याशी असा भेदभाव होत असेल, तर आम्ही मंडळात राहणार नाही, अशी भूमिका फिर्यादीने मांडली.

फिर्यादीत केलेल्या आरोपांनुसार, त्यावर कौशल्या अरुण सुरपाम हिने त्यांना न राहण्याबद्दल सांगून वर्गणी मागितली. कुसुम पेंदोर हिने "तुम्ही हात लावला तर बाकी बाया मानस खात नाही, आमचं अन्न वाया घालू का?" असे म्हटले. बेबीबाई चंद्राशा पेंदोर हिनेही तुमच्या समाजाच्या महिलांनी स्वयंपाक केला तर बाकी लोक जेवायला येत नाहीत आणि वर्गणी देत नाहीत, असे बोलून समाजाचा अपमान केला, असा आरोप फिर्यादीत आहे.

फिर्यादीनुसार हे तिथेच थांबले नाही. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सारिका निरुडवार आणि शिवानी निरुडवार यांच्यात कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले. ते शांत झाल्यानंतर शिवानी स्वप्नील निरुडवार हिने नरेश आलम यांच्या घरासमोर येऊन मातंग समाजाबद्दल अपमानास्पद, हीन आणि जातीवाचक भाषेत शिवीगाळ केली आणि सार्वजनिक ठिकाणी समाजाचा पाणउतारा केला, असाही आरोप आहे.

फिर्यादी अनुसूचित जातीच्या आहेत हे माहीत असूनही सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक हीन वागणूक देऊन अस्पृश्यतेच्या कारणावरून अपमान केला गेला, अशी त्यांची तोंडी तक्रार आहे. त्यावरून सावली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी शिवानी स्वप्नील निरुडवार, बेबीबाई चंद्राशा पेंदोर आणि कुसुम रतनशा पेंदोर या तिघींविरोधात नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ च्या कलम ७(१)(ड) आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या कलम ३(१)(र) नुसार गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन विनायक मुसले करत आहेत.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ