तोतलाडोह धरणात यंदा फक्त 49.82 टक्के पाणी, गेल्या वर्षी होते 99.92 टक्के
ऑक्टोबरमध्येच तोतलाडोह धरणात मे महिन्यासारखी स्थिती झाली आहे. अल निनोमुळे नागपूर जिल्ह्यात 35 टक्के कमी पाऊस झाला असून बाष्पीभवनाने साठा झपाट्याने घटत आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूर शहराला आणि जिल्ह्यातील अनेक उद्योग व कारखान्यांना पाणी देणाऱ्या तोतलाडोह धरणात ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यभर दुष्काळाचे सावट असतानाच आता नागपूर जिल्ह्यालाही त्याची झळ बसल्याचे चित्र समोर आले आहे.
आकडेवारी पाहिली तर फरक स्पष्ट दिसतो. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस तोतलाडोह धरणात तब्बल 99.92 टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र धरणात फक्त 49.82 टक्के पाणी आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर पेंच नदीवर हे धरण आहे. नागपूर शहराची तहान भागवण्याबरोबरच औद्योगिक गरज आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठीचे पाणीही याच धरणातून दिले जाते. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे नागपूर जिल्ह्यात 35 टक्के कमी पाऊस झाला. पाटबंधारे (जलसंपदा) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते त्याचा उलट परिणाम धरणातील जलसाठ्यावर दिसत आहे.
साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस जे दृश्य दिसायचे, ते यंदा ऑक्टोबरमध्येच दिसत आहे. धरणाच्या पाण्यातील वाळूच्या छोट्या टेकड्या दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात पाणी कमी झाल्यावर वर यायच्या. यंदा त्यांनी ऑक्टोबरमध्येच डोके वर काढले आहे.
ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनही वाढले आहे. नागपूर शहराला दोन दिवस पुरेल एवढे पाणी दर 7 ते 8 दिवसांत बाष्पीभवनाने उडून जात आहे, त्यामुळे जलसाठा वेगाने घटतो आहे. नागपूरकरांना आता पाणी खूप काळजीपूर्वक वापरावे लागणार असून उधळपट्टी टाळावीच लागेल. प्रशासनालाही उरलेल्या 49 टक्के पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. पेंचच्या घनदाट जंगलातील या धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता दुष्काळाची भीषण दाहकता समोर आली.
यवतमाळ जिल्ह्यातही अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा मोठा खंड पडला असून जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांत मिळून 76 टक्के जलसाठा आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 16 ऑक्टोबरपासून 10 टक्के कपात करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
कापूस, तूर आणि चारा पिकांसाठी पाणी मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ती लक्षात घेऊन पाणी आरक्षण समितीने बेंबळा आणि अरुणावती या मोठ्या प्रकल्पांतून आठ दिवसांत, मध्यम प्रकल्पांतून दोन दिवसांत आणि लघु प्रकल्पांतून गरजेनुसार तत्काळ पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात 3 मोठे प्रकल्प असून त्यात आज 67 टक्के जलसाठा आहे. 7 मध्यम प्रकल्पांत 82 टक्के, तर 63 लघु प्रकल्पांत 84 टक्के पाणी आहे. दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली असून तापमानही वाढते आहे. त्यामुळे बाष्पीभवन होऊन जलसाठ्यात कमालीची घट होत आहे आणि यंदा उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पाटबंधारे विभागाने शासन आदेशानुसार पाणी आरक्षणाचे नियोजन सुरू केले आहे.