बुधवार, 4 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
08:10  नागपूरच्या गोधनी रोडवर ट्रकने महिलेला चिरडले, दिवाळीच्या खरेदीला निघाले होते कुटुंब 00:10  नागपूरच्या गोधनी रोडवर भरधाव टिप्परने महिलेला चिरडले, मूल जखमी; २० दिवसांत दुसरा बळी 15:40  नागपूर जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदायला बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सुधारित आदेश 09:57  नागपूर जिल्ह्यात नवे बोअरवेल खोदायला आणि जुने बोअरवेल खोल करायला पुढच्या आदेशापर्यंत मनाई 3 नोव्ह | 20:23  नागपूरच्या गोधनी रोडवर ट्रकच्या धडकेत अश्विनी फलके यांचा जागीच मृत्यू, गावकऱ्यांचा रास्ता रोको 15:55  खंडणीचे लिफाफे दहा दिवसांपूर्वी पोस्टल बॉक्समध्ये टाकले होते, तपासात पोलिसांना महत्त्वाचा धागा
सर्व थेट अपडेट

दिवाळीआधी छत्रपती संभाजीनगरमधील २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा

दिवाळीआधी छत्रपती संभाजीनगरमधील २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाली आहे. उरलेल्या शेतकऱ्यांनाही दोन दिवसांत रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीआधी दिलासा देणारी बातमी आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा झाली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी ही माहिती दिली.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार रुपये अग्रीम मदत जमा करण्याची घोषणा शासनाने केली होती आणि त्यासाठी निधीची तरतूदही केली होती. अनुदान मिळताच जिल्हा प्रशासनाने सगळी प्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली, असे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले.

राज्य शासनाने संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ९ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामुळे बाधित शेतकरी मदतीची वाट पाहत होते. जिल्ह्यातील ५ लाख ९२ हजार २७१ शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आला असून जिल्हास्तरावरून त्याला मान्यता मिळाली आहे. दिवाळी तोंडावर आलेली असतानाही मदत मिळाली नाही, अशी ओरड सुरू होती. त्यामुळे शासनाने दिवाळीआधी ५ हजार रुपये अग्रीम खात्यात जमा करण्याची व्यवस्था केली.

त्यानुसार मंगळवारी (३ नोव्हेंबर) ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. उरलेल्या शेतकऱ्यांनाही दोन दिवसांत रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या मदतीसाठी अॅग्रीस्टॅक माहितीनुसार पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने मान्यता देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे, त्यांना या मदतीत प्राधान्य दिले गेले आणि अशा शेतकऱ्यांना अग्रीम मदत जमा करण्यासाठी मान्यता देण्यात आली. जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडून फार्मर आयडीनुसार शेतकऱ्यांचा डेटा मिळवला. त्यानंतर शेतकऱ्यांची तपासणी आणि मान्यता प्रक्रिया पूर्ण करून मदत जमा केली, असे जिल्हाधिकारी गौडा म्हणाले.

आतापर्यंत जिल्ह्यात ११९ कोटी ६६ लाख रुपये मदत झाली आहे. उरलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून जिल्हा आणि तालुका पातळीवरची कार्यालये अहोरात्र काम करत आहेत. सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

तालुकानिहाय रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी: छत्रपती संभाजीनगर १७,०३६, गंगापूर ३२,८५५, कन्नड ३८,१९१, खुलताबाद १०,८०४, पैठण ३२,८०५, फुलंब्री १५,६५०, सिल्लोड ३१,८१५, सोयगाव १४,७२३ आणि वैजापूर ४५,४४१. या सर्व तालुक्यांची मिळून एकूण संख्या २,३९,३२० आहे.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ