जंगलात शिकारीला गेले, प्राण्याचे डोळे समजून साथीदारावर गोळी; मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार, डॉक्टरसह सहा
चेना जंगलात बेकायदेशीर शिकारीदरम्यान गैरसमजातून झाडलेली गोळी साथीदाराला लागली; डॉक्टरसह सहा जणांना अटक.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ठाण्यातील घोडबंदरजवळच्या चेना जंगलात बेकायदेशीर शिकारीसाठी गेलेल्या एका गटात धक्कादायक प्रकार घडला आहे. गैरसमजातून झाडलेली गोळी गटातीलच एका साथीदाराला लागली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी विजय सुखरू सापटे हे या घटनेत मरण पावले. या गोळीबारात आणखी दोघे जखमी झाले आहेत. अंधारात बॅटरीचा प्रकाश पडला आणि तो प्राण्याचे चमकणारे डोळे आहेत असे समजून एका व्यक्तीने गोळी झाडली, असे समोर आले आहे.
१९ ऑक्टोबरच्या रात्री काही जण बेकायदेशीरपणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या चेना बीटमध्ये शिकारीसाठी गेले होते. त्यांच्याकडे बंदुका, छर्रे आणि जंगलात वाट दाखवण्यासाठी बॅटऱ्या होत्या. जंगलात पोहोचल्यावर हा समूह दोन गटांत विभागला गेला.
त्याच दरम्यान एका गटाच्या बॅटरीचा प्रकाश दुसऱ्या गटावर पडला. अंधारात चमकणारा तो प्रकाश म्हणजे प्राण्याचे डोळे आहेत, असा गैरसमज झाला. कोणतीही खातरजमा न करता एकाने बंदुकीचा ट्रिगर दाबला. गोळी थेट विजय सापटे यांच्या छातीत लागली आणि ते जागीच कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कल्पेश ढंगाळा आणि कुणाल शेलार हे दोघे गोळीबारात जखमी झाले. त्यांना काशिमीरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेच्या वेळी सापटे यांचा अल्पवयीन मुलगाही घटनास्थळी होता, असे समोर आले आहे.
आपलाच सहकारी गेल्याचे लक्षात आल्यावर गटातील सदस्य घाबरले. पोलिसांना कळवले तर आपण अडचणीत येऊ, या भीतीने त्यांनी सापटे यांच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना काहीही न कळवता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एवढेच नव्हे, तर सापटे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे दाखवण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. हे सगळे तपासात समोर आले आहे.
स्थानिक काशिमीरा पोलीस आणि वन विभागाच्या यंत्रणेने तपास करून या घटनेचा छडा लावला. बनावट प्रमाणपत्र देणारा डॉक्टर राजेश पालांडे याच्यासह एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
गोळीबारासाठी वापरलेले बेकायदेशीर शस्त्र नेमके कोणाचे होते, गोळी नेमकी कोणी झाडली आणि शिकारीसाठी गेलेल्या गटातील इतर सदस्यांची भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.