टेस्लाची रोडस्टर 2 सुपरकार समोर; हवेत झेपावणारा रॉकेट व्हेरिएंट, बुकिंगही सुरू
इलॉन मस्क यांच्या टेस्लाने टेक्सासमध्ये रोडस्टर 2 चे अनावरण केले. तीन व्हेरिएंट्स असून रॉकेट मॉडेल हवेत झेप घेऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
इलॉन मस्क यांची टेस्ला (Tesla) ही इलेक्ट्रिक वाहने बनवणारी कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे. गुरुवारी टेक्सास येथील स्पेसएक्स (SpaceX) च्या चाचणी केंद्रावर झालेल्या मोठ्या प्रात्यक्षिकात टेस्लाने आपल्या बहुप्रतीक्षित 'रोडस्टर 2' (Roadster 2) या सुपरकारचे अनावरण केले. ही कार फक्त रस्त्यावर धावत नाही, तर हवेतही झेप घेऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ जगभर खूप व्हायरल झाला आहे.
जवळपास दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टेस्लाने या रोडस्टरची झलक प्रत्यक्ष दाखवली. या कारमध्ये ऑटोमोबाईल आणि एरोस्पेस म्हणजे विमान व रॉकेट तंत्रज्ञानाचा संगम दिसतो. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीतील रॉकेट तंत्रज्ञान वापरून कारमध्ये खास 'कोल्ड-गॅस थ्रस्टर्स' (Cold-Gas Thrusters) बसवले आहेत. हे थ्रस्टर्स कारला जमिनीवरून थेट हवेत उचलतात आणि तिला नियंत्रितही करतात.
टेस्ला ही सुपरकार मुख्यतः तीन व्हेरिएंट्समध्ये बाजारात आणणार आहे. त्यांची नावे परफॉर्मन्स (Performance), थ्रस्ट (Thrust) आणि रॉकेट (Rocket) अशी आहेत.
'परफॉर्मन्स' हे रोजच्या वापरासाठी रस्त्यावर चालवायचे 'रोड-रेडी' (Road Ready) मॉडेल म्हणून तयार केले आहे. त्यानंतरचे 'थ्रस्ट' व्हेरिएंट रेसिंगची आवड असणाऱ्यांसाठी 'रेस-रेडी' (Race Ready) आहे. यात मागच्या बाजूला एअर थ्रस्टर्स असून खालच्या बाजूला खास 'सक्शन सिस्टीम' (Suction System) बसवली आहे. ही सिस्टीम कारच्या खालून हवा खेचून सुमारे २G इतका मोठा डाऊनफोर्स तयार करते. त्यामुळे कार थांबलेली असतानाही किंवा वेगात असतानाही उलट्या पृष्ठभागांना घट्ट धरून राहू शकते. थ्रस्ट मॉडेल अवघ्या ०.८१ सेकंदात ० ते १०० किमी/तास इतका वेग गाठू शकते, असेही सांगण्यात आले.
तिन्ही मॉडेल्समध्ये सर्वात जास्त लक्ष वेधले ते 'रॉकेट व्हेरिएंट' (Rocket Variant) ने. टेस्लाने हे मॉडेल 'एयर-रेडी' (Air Ready) श्रेणीत ठेवले आहे. हे १-सीटर मॉडेल असून कारच्या भोवती १० हाय-प्रेशर कोल्ड-गॅस थ्रस्टर्स बसवले आहेत. ६०० लिटर क्षमतेच्या अल्ट्रा-हाय प्रेशर एअर टँकमधून बाहेर पडणाऱ्या हवेच्या जोरामुळे ही कार काही सेकंद हवेत तरंगू शकते, कसरती करू शकते आणि पुन्हा सुरक्षितपणे जमिनीवर उतरू शकते.
प्रात्यक्षिकात या कारने टेस्लाची संपूर्ण लाईनअप आणि सायबरट्रक (Cybertruck) यांच्यावरून हवेत उंच उडी मारून दाखवली. तिथे उपस्थित असलेले अक्षरशः थक्क झाले. ऑटोपायलट आणि ड्रायव्हरलेस कार बनवणाऱ्या टेस्लाची ही एकमेव सुपरकार असेल, जी चालक पूर्णपणे स्वतः मॅन्युअली चालवू शकतील, हेही सांगण्यात आले.
कंपनीने जगभरात या सुपरकारचे बुकिंग सुरू केले आहे. 'परफॉर्मन्स' मॉडेलसाठी ५०,००० डॉलर्स (सुमारे ४८ लाख रुपये) अनामत रक्कम भरून बुकिंग करता येईल. 'थ्रस्ट' मॉडेलसाठी २,५०,००० डॉलर्स डिपॉझिट भरावे लागेल. सर्वात वरचे 'रॉकेट' मॉडेल फक्त खास निमंत्रणावरच (Invite-Only) उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार या कारचे अधिकृत व्यावसायिक उत्पादन २०२८ मध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) क्षेत्रातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि थरारक तांत्रिक झेप मानली जात आहे.