स्वामीस्थानात लहानग्या अवधूतचे आगमन, रणजीतसमोर उभे ठाकले नवे आव्हान
जय जय स्वामी समर्थ मालिकेच्या आगामी भागांत स्वामी नसताना आठ-नऊ वर्षांचा अवधूत स्वामीस्थानात येतो आणि रणजीतला थेट आव्हान देतो.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या आगामी भागांत प्रेक्षकांना एक अनपेक्षित आणि रहस्यमय वळण पाहायला मिळणार आहे. स्वामी कुठे आहेत, आणि त्यांच्या जागी आलेला हा छोटा अवधूत कोणते गूढ घेऊन आला आहे, असा प्रश्न या भागांतून उभा राहतो.
स्वामीस्थानात स्वामींची अनुपस्थिती असताना अचानक एका आठ-नऊ वर्षांच्या चुणचुणीत मुलाचा प्रवेश होतो. त्याचे नाव अवधूत. वय लहान असले, तरी त्याची भाषा, त्याचा आत्मविश्वास आणि बोलण्यातून दिसणारी विलक्षण समज पाहून प्रेक्षक थक्क होतील. त्याची वाणी स्वामींसारखी आहे, त्याच्यात विलक्षण शक्ती आहे आणि तो रणजीतला थेट आव्हान देतो. त्यामुळे हा बालक नेमका कोण, हा प्रश्न सगळ्यांना पडतो.
स्वामीस्थानात पाऊल ठेवताच अवधूतची गाठ रणजीत आणि त्याच्या साथीदारांशी पडते. रणजीतच्या डोक्यात विटी आदळते आणि तिथून या दोघांतला सामना सुरू होतो. पुढे तो हळूहळू अधिकच रंजक आणि उत्कंठावर्धक होत जातो. रणजीत उर्मटपणे बोलतो, पण अवधूत त्याला घाबरत नाही. त्याच्याच भाषेत, तरीही आपल्या निरागस आणि मिश्कील शैलीत तो उत्तर देतो आणि रणजीतला चांगलाच जेरीस आणतो.
लहान मुलाच्या रूपात असूनही अवधूतमध्ये ताकद आहे. त्याचे वागणे निर्भीड आहे आणि स्वामींच्या शिकवणीचा अचूक अर्थ समजावून सांगण्याची त्याची हातोटी आहे. हे सगळे पाहून रणजीतसह त्याचे साथीदारही गोंधळून जातात.
स्वामींनी सांगितलेल्या शस्त्रांचा अर्थ फक्त ढाल, तलवार किंवा धनुष्यबाण एवढाच नाही, असे अवधूत सांगतो. खऱ्या शस्त्रांची ताकद मनात आणि मनगटात असते, हे तो आपल्या बालसुलभ पण मार्मिक शब्दांत पटवून देतो. रणजीतला ही निर्भीड उत्तरे सहन होत नाहीत. मात्र अवधूतचा इशारा नुसत्या शब्दांपुरता राहत नाही. रणजीतला अचानक मृत्यूचे भय जाणवू लागते आणि त्याची अवस्था पाहून त्याचे साथीदारही हादरतात. स्वामीस्थानात येऊन स्वामींनाच आव्हान देऊ पाहणाऱ्या रणजीतला आता स्वतःच्या विनाशाची चाहूल लागणार का, हा प्रश्न आहे.
दरम्यान, स्वामीस्थानात सुईत दोरा ओवण्याच्या साध्या कृतीतून संयम, सातत्य आणि तपश्चर्येचा अर्थ उलगडतो. ब्रह्मचारिणी देवीच्या दिव्य दर्शनातून चारही स्त्रियांना आपल्या अंतर्मनातील शक्तीची जाणीव होते. स्वामींनी दिलेली शिकवणच त्यांच्यासाठी प्रभावी शस्त्र ठरते. केवळ सहन करायचे नाही, तर स्वतःमधले सामर्थ्य ओळखून अन्यायाविरुद्ध उभे राहायचे, अशी प्रेरणा या स्त्रियांना मिळते.
पण रणजीतचा सूड शांत झालेला नाही. स्वामीस्थान जाळून टाकण्याचा कट तो रचतो. त्याच्यासमोर अवधूत पुन्हा उभा ठाकतो. रणजीतने आखलेला हा मनसुबा तो पूर्ण करू शकेल का? स्वामींच्या अनुपस्थितीत त्यांच्याच विचारांचा आणि सामर्थ्याचा प्रत्यय देणारा अवधूत नेमका कोण आहे? तो स्वामींचा एखादा संकेत आहे, त्यांचा दूत आहे, की यामागे आणखी काही दैवी रहस्य दडले आहे? आणि मुळात स्वामी कुठे आहेत?
या प्रश्नांची उत्तरे शोधताना प्रेक्षकांना भक्ती, दैवी शक्ती, स्त्रीसामर्थ्य आणि अधर्माविरुद्धच्या संघर्षाचा एक नवा अध्याय अनुभवायला मिळणार आहे. अवधूतच्या खट्याळपणामागे दडलेले गूढ आणि स्वामींच्या प्रत्येक लीलेमागचा अर्थ जाणून घेण्यासाठी मालिकेचा आगामी भाग पाहावा लागेल.
'जय जय स्वामी समर्थ- जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा' ही मालिका दररोज रात्री ८.१० वा. कलर्स मराठीवर दाखवली जाते. ती कधीही, कुठेही JioHotstar वर पाहता येते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.