जय जय स्वामी समर्थ: विसर्जनाच्या दिवशी उलगडणार सावळ्याच्या भूतकाळाचं गूढ
कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने कथानकाला मोठं वळण मिळणार आहे.
कलर्स मराठीवरच्या 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेतलं कथानक गणेशोत्सवाच्या निमित्तानं एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी सावळ्याच्या आयुष्यातलं एक गूढ प्रकरण उघड होणार आहे. त्याला आतापर्यंत त्रास देत असलेली अस्पष्ट दृश्यं आणि भूतकाळाबद्दलचे प्रश्न आता त्याच्यासमोर स्पष्ट होणार आहेत. हे सगळं स्वामींच्या लीलेमुळे घडणार असल्याचं आगामी भागांमध्ये दाखवलं जाणार आहे.
सावळ्याला बरेच दिवस भूतकाळातली काही धूसर दृश्यं वारंवार दिसत होती. पण विसर्जनाच्या वेळी एक निर्णायक क्षण येणार आहे. बाप्पाची मूर्ती त्याच्या छातीला स्पर्श करताच त्याच्या नजरेसमोर पुन्हा तीच दृश्यं येतील, फक्त यावेळी ती अस्पष्ट नसतील. त्याचा भूतकाळ त्याच्यासमोर पूर्णपणे उभा राहील. या क्षणी सावळ्याला त्याचे खरे आई-वडील, त्यांच्यासोबत घडलेली भयंकर घटना आणि त्या घटनेमागे असलेला चेहरा दिसणार आहे. हा चेहरा ओळखताच सावळ्याला मोठा धक्का बसणार आहे.
सावळ्याला त्याचं सत्य कळावं आणि आयुष्याला योग्य वाट मिळावी, यासाठीच स्वामींच्या लीलेतून या सगळ्या घटना घडवल्या जात असल्याचं मालिकेत दाखवलं आहे. सावळ्याला इराच्या सहवासात आणण्यापासून त्याच्यातली माणुसकी जागी करण्यापर्यंत, या सगळ्यामागे स्वामींचा मोठा हेतू असल्याचं कथानकातून स्पष्ट होत आहे. आता सावळ्याच्या भूतकाळातलं सर्वात मोठं गुपित समोर येणार आहे. हे सत्य कळल्यानंतर त्याच्या मनात पुन्हा सूडाची भावना जागी होणार, की स्वामींच्या शिकवणीमुळे तो त्यावर मात करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दुसरीकडे मार्तंडने स्वामी स्थानाला दिलेल्या आव्हानामुळे सेवेकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. स्वामींची भक्ती आणि प्रचिती यांना थेट आव्हान देत त्याने अक्कलकोटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. स्वामी स्थानातला दिवा विझवून त्याने स्वामींच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं आहे. या घटनेमुळे कपिलाचा विश्वास डळमळताना दिसतोय, तर सुंदरा मात्र स्वामींवरच्या श्रद्धेवर ठाम राहून सगळ्यांना धीर देताना दिसणार आहे.
एकीकडे मार्तंडचं आव्हान, दुसरीकडे बाप्पाचं विसर्जन आणि त्याच वेळी सावळ्याच्या भूतकाळाचा उलगडा, अशा अनेक घटना एकाच वेळी घडणार आहेत. स्वामींनी विसर्जनाच्या वेळी येण्याचा शब्द दिला आहे, त्यामुळे त्यांच्या आगमनानंतर कथानकाला आणखी कोणतं वळण मिळणार, याबद्दल उत्सुकता आहे. सावळ्याच्या आयुष्यातलं हे सत्य समोर आल्यावर त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा काय असेल, मार्तंडच्या आव्हानाला स्वामी कसं उत्तर देतील आणि या सगळ्या घटनांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे, हे आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
'जय जय स्वामी समर्थ - उत्सव बाप्पाचा, लीला स्वामींची' ही मालिका दररोज रात्री ८:१० वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहता येते.