मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

तुळशी गावात पोहोचताच शरद पवार यांच्याकडून सोलापूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत

तुळशी गावात पोहोचताच शरद पवार यांच्याकडून सोलापूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

"तुळशी गाव विकणे आहे" असा बॅनर लावणाऱ्या माढा तालुक्यातील तुळशी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट दिली. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी ५० लाख रुपयांची मदत दिली.

माढा तालुक्यातील तुळशी गावात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट दिली. पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ आली आहे, असं सांगत या गावाने "तुळशी गाव विकणे आहे" असा बॅनर लावला होता. पवार यांनी गावातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची मदत दिली. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

राज्यातली दुष्काळाची स्थिती समजून घेण्यासाठी पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून केली. माढा तालुक्यात ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. याच माढा मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.

तुळशी गावातली पाणीटंचाई गंभीर झाली होती. प्यायच्या पाण्यासाठी लोकांची सतत धावपळ सुरू होती आणि दुष्काळामुळे अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. या गोष्टींकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थांनी गाव विकण्याचा बॅनर लावला होता. या बॅनरची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली होती. आता स्वतः पवार गावात पोहोचल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर आपल्या अडचणी आणि व्यथा मांडल्या.

गावातली परिस्थिती जाणून घेतल्यानंतर पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. या मदतीसोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

पवार यांनी यावेळी १९७२ च्या दुष्काळाची आठवण सांगितली. तेव्हा आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होतो आणि दुष्काळग्रस्तांना शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला होता, असं त्यांनी सांगितलं.

मराठवाड्यातला दुष्काळी दौरा पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. दुष्काळावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांना लेखी सूचना दिल्या होत्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येतील, तेव्हा सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांना शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वेळ मिळावा, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ