मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

गोंदियात ओबीसींचा मोर्चा, जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

गोंदियात ओबीसींचा मोर्चा, जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

जयस्तंभ चौकातून निघालेल्या मोर्च्यात जिल्ह्यातील हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले आणि जातनिहाय जनगणनेची मागणी त्यांनी लावून धरली.

जातनिहाय जनगणना व्हावी, या मागणीसाठी गोंदिया शहरात ओबीसी बांधवांनी भव्य महामोर्चा काढला. "ओबीसींचा डाटा नाही तर वाटाही नाही" आणि "आपली लढाई आपणच लढावी" असा ठाम निर्धार घेऊन आज, १ तारखेला, शहरातील जयस्तंभ चौकात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. गोंदिया जिल्ह्यातील हजारो ओबीसी बांधव, सामाजिक कार्यकर्ते, तरुण आणि महिला स्वतःहून यात सहभागी झाल्या. जयस्तंभ चौकातूनच मोर्च्याला सुरुवात झाली. "जय ओबीसी" च्या जोरदार घोषणांनी संपूर्ण गोंदिया शहर दणाणून गेले होते.

जनगणनेत अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्याप्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम का दिला जात नाही, असा संतप्त सवाल यावेळी विचारण्यात आला. देशात सर्व घटकांची स्वतंत्र मोजदाद होत असताना बहुसंख्य असलेल्या ओबीसी घटकाची जातनिहाय जनगणना करायला शासन टाळाटाळ का करत आहे, याबद्दल आंदोलकांनी रोष व्यक्त केला. सहभागी ओबीसी बांधवांनी जातनिहाय जनगणनेची हाक देत लढा तीव्र करण्याचा इशाराही दिला.

केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना केली जात आहे, पण या जनगणनेत ओबीसींवर अन्याय झाला आहे, असा आरोप ओबीसी संघटनांच्या वतीने करण्यात आला. इतर प्रवर्गांप्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यामुळे जनगणनेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या ओबीसींवर जाणूनबुजून अन्याय केला जात आहे, असाही आरोप संघटनांनी केला.

मोर्चात बोलताना देशातील जंगलातले पशू, पक्षी आणि प्राणी यांची स्वतंत्र गणना होते आणि त्यांचे संवर्धन केले जाते, पण माणूस म्हणून जन्माला आलेल्या देशातील ५० टक्क्यांहून अधिक ओबीसींची गणना न करणे हा संविधानाने दिलेल्या हक्कांवर मोठा अन्याय आहे, असा घणाघाती सूर उमटला. आतापर्यंत स्वतःच्या हक्कांबाबत अनभिज्ञ राहून आम्ही अनेक पिढ्या घालवल्या, आता कुणीतरी मसिहा येईल आणि आमची लढाई लढेल हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे, असे मोर्चेकऱ्यांनी म्हटले. सर्वांनाच स्वार्थ चिकटलेला असल्यामुळे आता ओबीसींनी स्वतः रस्त्यावर उतरून ही लढाई जिंकलीच पाहिजे, असा एल्गार त्यांनी केला.

टाळाटाळीची भूमिका सोडून शासनाने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. "उठ ओबीसी राजा उठ! तुझ्या उठण्याकडे कुटुंब, समाज आणि संपूर्ण ओबीसी संवर्गाचे भवितव्य डोळे लावून बसले आहे," या आवाहनाने तरुणांमध्ये नवा जोश भरला.

हा मोर्चा अत्यंत शांततेत आणि लोकशाही मार्गाने पार पडला. त्याच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरण्यात आली. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही, तोपर्यंत बहुसंख्य ओबीसी स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा शासनाला देण्यात आला.

सकल ओबीसी महामोर्चाचे संयोजक उमेश कोराम, मनोज मेंढे, सुनील पटले, खेमेंद्र कटरे, कैलाश भेलावे, भूमेश शेंडे, अमर वर्हाडे, पुष्पा खोटेले, एस. यु. वंजारी, पंकज यादव, चंद्रकुमार बहेकार, रवी अंबुले, अजाबराव रिनायत, निखिल बनसोड, प्रकाश काकडे, गुड्डू लिल्हारे, सुनील तरोणे, राजेश नागरीकर, गंगाधर परशुरामकर, वाय. टी. कटरे, ओम पटले, विजय फुंडे, बंटी पंचबुद्धे, मनोज शरणागत, ओम कटरे, रवी पटले, गणेश बरडे, पप्पू पटले, भूमेश टाकरे, संतोष खोब्रागडे, सुरेंद्र सोनवणे, बी. एम. करमकर, सावन कटरे, तीर्थराज उके, रवी भांडारकर, अतुल सतदेवे, परेश दुरुगकर, विनायक येडेवार, कृष्णा ब्राह्मणकर, भोजराज फुंडे, नरेश परिहार, दिलीप गौतम, प्रकाश पटले, किशोर डोंगरवार, संदीप तिडके, खोमेंद्र रहांगडाले, मालती किन्नाके, सुरेंद्र खोब्रागडे आणि सविता बेदरकर यांच्यासह हजारो समाजबांधवांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ