स्मार्ट मीटरला विरोध वाढताच जुन्या मीटरधारकांना दुप्पट वीजबिले, ग्राहक संतप्त
जुन्या मीटरधारकांना दुप्पट वीजबिले आल्याने म्हसवड परिसरातील ग्राहकांमध्ये संताप आहे. मीटर फॉल्टी असल्याचे सांगून ते बदलण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
स्मार्ट वीज मीटरला ग्राहकांकडून होत असलेल्या जोरदार विरोधावर वीज कंपनीने एक नवा मार्ग काढला आहे, असा आरोप ग्राहक करत आहेत. या मार्गामुळे ग्राहकांची बोलतीच बंद झाली आहे. मात्र त्यातून ग्राहकांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडत असल्याने म्हसवड परिसरातील अनेक वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षापासून वीज कंपनीने ग्राहकांचे जुने वीज मीटर काढून त्या जागी नवे स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली. हे मीटर बसवताना ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही. ज्यांचे मीटर बदलले गेले, त्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिल आले. त्यामुळे शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत स्मार्ट मीटरला विरोध वाढत गेला.
तरीही स्मार्ट मीटरच्या कंत्राटदारांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मीटर बदलण्याचे काम सुरूच ठेवले होते, असे सांगितले जाते. काही ठिकाणी आंदोलने झाली. काही ठिकाणी मीटर बदलायला आलेल्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांनी हाकलून लावले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही प्रक्रिया काहीशी मंदावली होती.
आता ज्या ग्राहकांचे मीटर जुने आहेत, त्यांना गेल्या काही महिन्यांपासून वाढीव रकमेची वीजबिले दिली जात आहेत. ही वाढ पूर्वीपेक्षा थोडी जास्त असल्याने ग्राहकांनी फारशी तक्रार केली नव्हती. पण आता कंपनीने याच ग्राहकांना थेट दुप्पट वीजबिले पाठवली आहेत. त्यामुळे संताप उसळला आहे.
जादा आलेल्या बिलाबद्दल विचारायला ग्राहक कंपनीच्या कार्यालयात गेला, तर त्याला "तुमचे वीज मीटर फॉल्टी असून ते बदलावाच लागेल," असे सांगितले जात आहे. 'मीटर न बदलल्यास पुढचे वीज बिल याहून अधिक येऊ शकते,' अशी भीतीही दाखवली जात आहे. त्यामुळे 'भिक नको पण कुत्रे आवर' अशी वेळ ग्राहकांवर आली आहे.
या प्रकाराविरोधात वीज ग्राहक संरक्षण समिती कोणती उपाययोजना करणार की ग्राहकांना वाऱ्यावर सोडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. यातून वीज कंपनी आणि संबंधित कंत्राटदार यांची छुपी युती उघड झाली आहे, असेही म्हटले जात आहे. यापूर्वी कंपनीचे अधिकारी "आमचा या कंत्राटदारांशी काहीही संबंध नाही," असे म्हणत होते. नंतर मात्र तेच अधिकारी व कर्मचारी कंत्राटदारांसोबत ग्राहकांच्या घरोघरी फिरू लागले आणि ग्राहकांचा रोष वाढला. त्यावर पर्याय म्हणून ही नवी युक्ती लढवली जात असल्याचे बोलले जाते.
ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना सध्या अशी दुपटीची बिले मोबाईलवर दिसत आहेत. ही वाढलेली बिले प्रत्यक्ष हातात पडतील, तेव्हा ग्राहकांना नक्कीच '४२०' चा करंट बसेल, अशी टीका होत आहे.
दरम्यान, राज्यभरातून स्मार्ट मीटरला तीव्र विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घेऊन सभागृहात भाष्य केले होते. स्मार्ट मीटरसाठी ग्राहकांना सक्ती करता येणार नाही आणि हे मीटर फक्त उद्योगांसाठी (इंडस्ट्रीसाठी) बसवले जातील, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे सामान्य ग्राहक खूश झाले होते. मात्र आता जुन्या मीटरधारकांची बिले दुप्पट करून कंपनीने त्या आश्वासनालाच सुरुंग लावला, अशी ग्राहकांची भावना आहे.