इस्त्री, ओव्हन, एअर फ्रायरसारख्या उपकरणांमुळे वीजबिल कसे वाढते, जाणून घ्या
फ्रिज, पंखा किंवा एसीकडेच लक्ष देण्याऐवजी रोजच्या वापरातील छोट्या उपकरणांचाही वीजबिलावर परिणाम होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे.
घरातील वीजबिल अचानक वाढल्यावर आपण पहिल्यांदा फ्रिज, पंखा किंवा एसीकडेच बोट दाखवतो. पण रोजच्या वापरातली अनेक छोटी उपकरणंही वीजबिलात मोठा वाटा उचलत असतात. एखादं उपकरण किती युनिट वीज खाते, हे त्याची पॉवर रेटिंग, ते किती वेळ चालतं आणि किती वेळा वापरलं जातं यावर ठरतं. त्यामुळे नुसतं घरात किती उपकरणं आहेत हे बघण्यापेक्षा ती किती वेळ सुरू असतात, हे तपासणं जास्त महत्त्वाचं आहे.
कपडे इस्त्री करायला वापरला जाणारा आयर्न रोज फार वेळ चालत नाही, पण त्याची पॉवर मात्र बरीच जास्त असते. त्यामुळे रोज भरपूर कपडे इस्त्री करत असाल तर वीजवापर वाढू शकतो. इलेक्ट्रिक ओव्हन, एअर फ्रायर आणि काही किचनमधली मशीनसुद्धा तुलनेने जास्त पॉवरवर चालतात. एअर फ्रायर कमी वेळ वापरला जात असला तरी तो वारंवार वापरल्यास त्याचा परिणाम बिलावर दिसू शकतो.
वॉशिंग मशीनमध्ये मोटरसोबत गरम पाण्याची सोय असेल तर वीजवापर आणखी वाढतो. मिक्सर आणि ग्राइंडरची पॉवरही जास्त असते, पण ते फक्त काही मिनिटांसाठीच वापरले जात असल्याने त्यांचा एकूण वीजखर्च तुलनेने कमी राहतो. म्हणजे इथे उपकरण किती वेळ चालतं, हाच मुद्दा कळीचा ठरतो.
टीव्ही आणि लॅपटॉपची पॉवर आयर्न किंवा ओव्हनपेक्षा कमी असते. पण टीव्ही रोज अनेक तास सुरू ठेवला की महिन्याचा वापर वाढतो. लॅपटॉप, मोबाईल चार्जर आणि हेडफोनसारख्या उपकरणांचा प्रत्येक वापरामागचा वीजखर्च तसा कमीच असतो. तरीही अनेक उपकरणं सतत चार्जिंगला लावून ठेवण्याची सवय टाळलेली बरी.
व्हॅक्यूम क्लीनर, अंडी उकडायचं इलेक्ट्रिक उपकरण, व्हेपर मशीन, मसाज मशीन आणि डास मारायची इलेक्ट्रिक बॅट यांचा वापर साधारणपणे कमी वेळेसाठीच होतो. त्यामुळे यांचा एकूण वीजवापर कसा आहे, हे तुमच्या वापराच्या सवयीवर अवलंबून असतं. बिल का वाढतंय हे शोधताना घरातल्या प्रत्येक उपकरणाची वॅट क्षमता आणि ते किती वेळ चालतं, या दोन्ही गोष्टी तपासायला हव्यात.
वीजबिल कमी करायचं असेल तर उपकरण वापरून झाल्यावर स्विच आणि प्लग बंद करणं, गरज नसताना चार्जर लावून न ठेवणं आणि जास्त पॉवरची उपकरणं गरज असेल तेव्हाच वापरणं फायद्याचं ठरतं. उपकरणावर लिहिलेली वॅट रेटिंग बघून ते रोज किती वेळ वापरलं जातं, याचा अंदाज घेतला तर घरात नेमकं कोणतं उपकरण जास्त वीज खात आहे, हे सहज लक्षात येतं.