शरद पवार यांना रुग्णालयातून सुट्टी; सुनेत्रा पवार भेटीला न गेल्याची चर्चा
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाला असून प्रकृती स्थिर आहे. उपचारांच्या काळातल्या भेटीगाठींवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र ते रुग्णालयात असताना झालेल्या भेटीगाठी आणि काही नेत्यांची गैरहजेरी यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सगळ्यात जास्त चर्चा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आहे. शरद पवार यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून तीन वेळा वेळ मागण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. तरीही शेवटपर्यंत ही भेट झाली नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनीही रुग्णालयात जाऊन भेट घेतली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र पार्थ पवार आणि जय पवार या दोघांनी फोन करून आजोबांच्या प्रकृतीची चौकशी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. त्या वेळी शरद पवार यांनी पटेल यांना १० तारखेनंतर पुन्हा चर्चा करू, असे सांगितल्याचे वृत्त आहे. या भेटीत नेमके काय बोलणे झाले, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
पटेल यांच्याशिवाय जयंत पाटील, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, सुशीलकुमार शिंदे आणि उद्योगपती गौतम अदानी यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवार यांना भेटल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
याच दरम्यान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबद्दल एक विधान केले होते. अजित पवार यांनी विलिनीकरणाच्या संदर्भात बैठका घेतल्या होत्या आणि त्याबद्दल आपल्याला कल्पना दिली होती, असे तटकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली नसल्याचेही बोलले जात आहे.
शरद पवार दोन दिवसांच्या उपचारानंतर मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी परतले होते. मात्र संध्याकाळी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना परत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा दोन दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातील भेटीगाठी आणि विलिनीकरणाबद्दलच्या चर्चांमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी होतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.