मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

टोरंटकडून पक्षांना इलेक्टोरल बाँड्सचा निधी गेल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

टोरंटकडून पक्षांना इलेक्टोरल बाँड्सचा निधी गेल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

कर्जतमधील सायडोंगर प्रकल्पावरून वाद सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत टोरंट कंपनीच्या देणग्यांचे आकडे मांडले.

कर्जतमधील सायडोंगर येथे झालेल्या वृक्षतोडीमुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्जतमधील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि काही राजकीय पक्षांचे नेते यांनी या प्रकल्पाला विरोध करत जोरदार टीका केली आहे. आता या वादात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे.

आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सायडोंगर येथे होणाऱ्या टोरंट प्रकल्पावर भाष्य केले. टोरंट कंपनीकडून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आम आदमी पार्टी यांनी राजकीय पक्ष निधी घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही त्यांनी या मुद्द्यावरून लक्ष्य केले.

आंबेडकर यांनी सांगितले की, टोरंट पॉवरने इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून विविध पक्षांना निधी दिला. त्यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार भाजपला ७६ कोटी रुपये, काँग्रेसला १७ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसला ३.५ कोटी, शिवसेनेला ३ कोटी आणि आम आदमी पार्टीला ७ कोटी रुपये मिळाले.

त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार टोरंट पॉवरचा एक प्रोजेक्ट टोरंटो फार्मसिटीक्युल डोनेशन या नावाने आसामच्या सिलिगुडीमध्ये आहे. या कंपनीनेही इलेक्टोरल बाँड्स विकत घेऊन भाजपला ६१ कोटी रुपये दिले, असे आंबेडकर यांनी म्हटले. याच कंपनीकडून काँग्रेसला ५ कोटी, आम आदमी पार्टीला १ कोटी, समाजवादी पक्षाला ३ कोटी, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला ७ कोटी आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला ५० लाख रुपये मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन्ही कंपन्यांच्या देणग्या मिळून भाजपला आतापर्यंत एकूण १३७ कोटी रुपये आणि काँग्रेसला २२ कोटी रुपये मिळाले, असा आंबेडकर यांचा दावा आहे. ही सर्व देणगी २०२२ ते २४ या काळात देण्यात आली, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय टोरंट कंपनीचा आयपीएलशी संबंध आहे आणि अमित शाहच्या मुलाशीही याचा संबंध आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले की, ज्या राजकीय पक्षांनी टोरंटकडून निधी घेतला, त्यांचे नेते रायगडच्या कर्जतमध्ये शेतकऱ्यांना भेटले आणि आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत असे सांगितले. त्यांचा सवाल असा आहे की, हा राजकीय निधी घेतल्यानंतर हे पक्ष टोरंट ग्रुपसोबत उभे राहणार की सह्याद्री वाचवण्यासाठी लढणाऱ्या लोकांसोबत? या पक्षांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, सायडोंगर प्रकल्पासाठी ३२,४९० झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी नाराज आहेत. हा प्रकल्प ३,००० मेगावॅट क्षमतेचा आहे आणि त्यावरून पर्यावरण विरुद्ध विकास हा मुद्दा चर्चेत आला आहे. वृक्षतोडीला विरोध वाढल्यानंतर ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आल्याचेही वृत्त आहे. आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या इलेक्टोरल बाँड्सच्या मुद्द्यावर संबंधित राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ