मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:34 IST

सावलीत वाघाच्या हल्ल्यात दुसऱ्या शेतकऱ्याचा बळी, वडेट्टीवार यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

सावली तालुक्यात गुरे चारताना वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर २१ सप्टेंबरला सामदा बुज परिसरातही हेमंत अशोक भुरसे यांचा असाच बळी गेला. या घटनांनंतर वडेट्टीवार यांनी वनविभागावर संताप व्यक्त केला आहे.

सावलीत वाघाच्या हल्ल्यात दुसऱ्या शेतकऱ्याचा बळी, वडेट्टीवार यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात वाघाच्या सलग हल्ल्यांमुळे जंगलालगतच्या गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सावली वनपरिक्षेत्रातील निलसनी-पेठगाव परिसरात काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. गुरे चारायला गेलेल्या या शेतकऱ्याचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच २१ सप्टेंबर रोजी सामदा बुज परिसरात हेमंत अशोक भुरसे या शेतकऱ्याचाही वाघाच्या हल्ल्यात बळी गेला.

एका पाठोपाठ एक होणाऱ्या या घटनांमुळे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी वनविभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नरभक्षी वाघाचा तातडीने बंदोबस्त न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी वनविभागाला दिला आहे.

वनविभाग नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून विचारला जात आहे. शेतकरी, गुराखी, शेतमजूर आणि जंगलालगतच्या गावांतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. "नागरिकांनी शेती करायची कशी? गुरे चारायची कुठे? कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? प्रत्येक वेळी वनविभागाने केवळ गस्त वाढवली असे सांगून प्रश्न सुटणार आहे का?" असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

सावली तालुक्यातील अनेक गावांतील लोकांचा शेती आणि जंगलाशी रोजचा संबंध येतो. खरीप हंगामाची कामे सुरू असताना शेतकऱ्यांना शेतात जाणे भाग पडते. मात्र वाघाच्या दहशतीमुळे शेतात जाण्यापूर्वीच कुटुंबीयांच्या जिवाची घालमेल होत आहे. गुरे चारायला गेलेल्या लोकांवरच हल्ले होत असल्याने ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

"शेतकऱ्याला आपल्या शेतात जायचीच भीती वाटत असेल तर ही सामान्य परिस्थिती नाही," अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. घटना घडल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचतात, पंचनामा करतात आणि गस्त वाढवल्याचे सांगतात, पण नागरिकांचा मूळ प्रश्न कायमच राहतो, वाघाचा धोका कमी करण्यासाठी ठोस आणि कायदेशीर उपाययोजना कधी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

वन्यजीवांच्या संरक्षणाला आपला विरोध नाही, मात्र जंगलाच्या सीमेवर राहणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जिवाचे रक्षण करणे हीदेखील शासनाची जबाबदारी आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. "वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली माणसांच्या जिवाची किंमत शून्य करता येणार नाही. नागरिकांचा जीव धोक्यात असताना प्रशासनाने कागदी अहवाल, सूचना आणि बैठकींपलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृती करावी," असा आक्रमक सूर त्यांनी लावला.

"जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. आणखी एखादा निष्पाप जीव जाण्याची वाट पाहू नका. सावली तालुक्यातील नागरिकांच्या जिवाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी. तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू आणि तीव्र जनआंदोलन उभारू," असा स्पष्ट इशारा आमदार विजय वडेट्टीवार यांनी वनविभागाला दिला आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ