सावली तालुक्यात वाघाचा हैदोस, महिनाभरात तीन गुराख्यांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वाघाने नागरिकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. सामदा बुज, केरोडा, व्याहाड बुज, निलसनी पेटगाव आणि सोनापूर या भागांत वाघाचा वावर सातत्याने वाढत असून, याच परिसरात वाघाने सलग हल्ले करत माणसांचे बळी घेतले आहेत. यामुळे या भागातील शेतकरी आणि गुराख्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे मागील महिनाभरात एकाच वाघाने तीन गुराख्यांचा जीव घेतला, तर एका शेतकऱ्याला वाघाने गंभीर जखमी केले आहे. हल्ले करणारा वाघ अद्यापही मोकाट फिरत असल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
घटनांचा क्रम पाहिला तर १ ऑगस्ट रोजी सामदा येथील गुराखी हिरामण साखरे यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी केरोडा येथील नामदेव कुकडे यांच्यावर वाघाने हल्ला केला, ज्यात ते जखमी झाले. १२ सप्टेंबर रोजी व्याहाड बुज येथील शेतकरी अशोक ठाकरे यांच्या बैलावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. त्यापाठोपाठ १६ सप्टेंबर रोजी निलसनी येथील वासुदेव वाकुडकर यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे परिसरातील भीती आणखी वाढलेली असतानाच सोमवारी सायंकाळी सामदा बुज येथील तरुण गुराखी हेमंत अशोक भुरसे यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचाही बळी घेतला.
सलग घडलेल्या या घटनांमुळे सावली तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. या भागातील बहुतांश शेतकरी पशुपालनावर उदरनिर्वाह करतात आणि गुरे चारण्यासाठी त्यांना जंगलालगतच्या परिसरात जावे लागते. मात्र वाघाचा वाढता वावर आणि सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे गुरे चारण्यासाठी बाहेर पडणेही आता धोकादायक ठरत आहे. तीन गुराखी दगावल्याने गावकऱ्यांसमोर गुरे चारण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कापसी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊराव कोठारे यांनी सांगितले की, सावली तालुक्यात मागील एक महिन्यात वाघाच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्या असून, तिन्ही घटनांत गुरे चारण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाघांच्या बंदोबस्तासोबतच गुरे चारण्यासाठी वनविभागाने सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी आणि नरभक्षी वाघाला तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी त्यांनी केली.
चंद्रपूरचे विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांनी सामदा बुज परिसरात भ्रमंती करणाऱ्या एकाच वाघाने तिन्ही बळी घेतल्याची पुष्टी केली. या वाघाला जेरबंद करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, प्रस्तावाला मंजुरी मिळताच वाघाला जेरबंद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जंगल परिसरात वनविभागाची टीम वाघाच्या मागावर असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी आणि गुराख्यांनी जंगल परिसरात जाताना योग्य ती काळजी घ्यावी आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.