शाह हेच लॉरेन्स बिश्नोई, दसरा मेळाव्यात संजय राऊत यांचा आरोप
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर टीका केली.
मुंबईत शिवतीर्थावर झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
राऊत म्हणाले, लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही. गृहमंत्री अमित शाह हेच देशातील सर्व माफिया चालवतात आणि तेच लॉरेन्स बिश्नोई आहेत. शस्त्र आता गुंडांच्या हाती गेली आहेत आणि त्या गुंडांचे सरदार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावर उत्तर एकच आहे, ते म्हणजे शिवसेना, आणि जो शिवसेनेचे नाव घेईल त्याचे संरक्षण होईल, असे ते म्हणाले. पुढच्या दसरा मेळाव्यात इथे आपला धनुष्यबाण असेल, असे भाकितही राऊत यांनी केले.
एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याची राऊत यांनी 'बिकाऊ मालाचा मेळावा' म्हणत खिल्ली उडवली. राज्यात दोन शिवसेनेचे मेळावे होत आहेत, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा राऊत भडकले. दोन मेळावे होतायत असे विचारणाऱ्या पत्रकाराला आपण शटअप (चूप बसा) सांगितले, असे ते म्हणाले. शिवसेना एकच आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेंची आहे, असे सांगून ते म्हणाले की शिवतीर्थावर समोर बसलेला हा 'टिकाऊ माल' आहे आणि तिकडे गेलेला 'बिकाऊ माल' आहे. तिकडे कसला मेळावा, ते दांडिया खेळत बसले असतील, त्यांच्याकडे कोणताही विचार किंवा संघर्ष नाही, असेही राऊत म्हणाले.
शिंदे गटाला उद्देशून राऊत यांनी थेट इशारा दिला. इथे प्रत्येकाच्या हातात बांबू आहे आणि गद्दारांना तो कुठे जाईल हे कळणारही नाही, असे ते म्हणाले. या शिवसेनेशी पंगा घेण्याचे प्रयत्न गेल्या ६० वर्षांत अनेकांनी केले, भले-भले आले आणि गेले, पण या गर्दीला कधी ओहोटी लागली नाही, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचा संदर्भ देत राऊत यांनी मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. प्रत्येक पिढी बाळासाहेबांच्या विचारांनी धगधगत आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारबद्दल बोलताना राऊत म्हणाले, इटली आणि फ्रान्सप्रमाणे आता भारतातही जनता रस्त्यावर उतरली आहे. मोदी-शहांना कोणी घाबरत नाही, आता हेच दोघे जनतेला घाबरतात. पुढच्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोदी सरकार जाणार, असे भाकित त्यांनी केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले की, १९९३ ते ९५ च्या काळात मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या युती सरकारने 'बुलेट फॉर बुलेट'चे धोरण स्वीकारून मुंबईतील अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडले होते. मात्र आज सत्तेसाठी लाचार झालेली भाजप गुन्हेगारांपुढे हतबल झाली आहे, असे त्या म्हणाल्या. भर रस्त्यात बाबा सिद्दिकींची हत्या होते, पूर्णेकरांचा खून होतो, सलमान खान, रोहित शेट्टी आणि टायगर श्रॉफच्या घरावर गोळीबार करून बिश्नोई गँग उघडपणे जबाबदारी स्वीकारते आणि गृहमंत्रालयाची लायकी काढते, असेही अंधारे यांनी म्हटले. देवेंद्रजी, कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणे ही तुमच्या बसची बात नाही, असे त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान दिले. माझं चॅलेंज आहे मुख्यमंत्री फडणवीसांना, जर हिंमत असेल तर लॉरेन्स बिश्नोईला गुजरातच्या जेलमधून खाली ओढून मुंबईत आणा आणि धडा शिकवा, मोठ्या वल्गना करू नका, कृती करा, असे ते म्हणाले.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.