शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:52 IST

कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर अडकला बिबट्या; दरवाजा उघडताच महिलेवर झेप, संगमेश्वरमध्ये थरार

संगमेश्वर तालुक्यातील कोंडये सुवरेवाडीत कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर बंद राहिलेल्या बिबट्याने दरवाजा उघडताच बाहेर झेप घेतली. यात मीना सुवरे जखमी झाल्या, पण थोडक्यात बचावल्या.

कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर अडकला बिबट्या; दरवाजा उघडताच महिलेवर झेप, संगमेश्वरमध्ये थरार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातल्या कोंडये सुवरेवाडीत अंगावर काटा आणणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सुवरे यांच्या घराशेजारी चिरेबंदी खोली आहे. तिथे रोज संध्याकाळी कोंबड्या शिरल्यानंतर बाहेरून दरवाजा लावला जातो. यावेळीही तसाच दरवाजा लावला गेला, पण त्याआधीच एक बिबट्या छुप्या मार्गाने त्या खोलीत शिरला होता. हे कोणाच्याही लक्षात आले नाही, कोणालाही त्याचा संशयही आला नाही.

त्यामुळे बिबट्या रात्रभर त्या खोलीतच बंद राहिला आणि आत असलेल्या सर्व कोंबड्यांचा त्याने फडशा पाडला. रात्रभर हा प्रकार सुरू होता, तरी घरातल्या सदस्यांना त्याची किंचितही कुणकुण लागली नाही.

दुसऱ्या दिवशी दुपारी मीना धोंडू सुवरे नेहमीच्या सवयीप्रमाणे कोंबड्यांना बाहेर सोडायला खोलीचा दरवाजा उघडायला गेल्या. दरवाजा उघडताच आत कोंबड्या दिसण्याऐवजी बाहेर पडायला व्याकुळ झालेला बिबट्या दबा धरून बसलेला दिसला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दरवाजा उघडताच बिबट्याने सुटकेसाठी थेट बाहेरच्या दिशेने भीषण झेप घेतली आणि जंगलाच्या दिशेने पळ काढला.

या धावपळीत बिबट्याचे नख मीना यांच्या चेहऱ्याला लागले आणि त्या जखमी झाल्या. सुदैवाने बिबट्याने पुन्हा हल्ला केला नाही, त्यामुळे मीना सुवरे यांचा जीव थोडक्यात वाचला. घटनेनंतर स्थानिकांनी जखमी मीना सुवरे यांना तातडीने फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले.

ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ हादरून गेले आणि संपूर्ण सुधरेवाडीत भीतीचे सावट पसरले आहे. गौढे व आडोशाच्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून गस्त वाढवावी, अशी तीव्र मागणी ग्रामस्थ करत आहेत.

कोकणातील काही जिल्ह्यांत बिबट्यांनी चांगलीच दहशत माजवायला सुरुवात केली आहे. बिबटे वारंवार नागरी वस्तीत दिसू लागल्याने नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखच्या साडवली-सह्याद्री नगर परिसरातही बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, 10 ऑक्टोबरला पहाटे परिसरातील स्थानिक नागरिक भाई शिंदे यांच्या घरासमोर बिबट्या फिरताना दिसला. हा संपूर्ण प्रकार घराबाहेर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ